चंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे ‘जंगलच्या राजा’चे साम्राज्य. वन्य प्राण्यांच्या सहज दर्शनासाठी ताडोबा विशेष उल्लेखनीय आहे. म्हणूनच जंगल सफारीसाठी या प्रकल्पाला विशेष पसंती असते, दरवर्षी हजारो पर्यटक वाघ पाहण्यासाठी खास ताडोबात येतात. पण, यापुढे या व्याघ्र प्रकल्पात पर्यटन करण्यासाठी जाणाऱ्या सामान्य माणसांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण वनविभागानं ताडोबातील प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली आहे. पूर्वी ७०० ते १००० च्या आसपास असणारं प्रवेश शुल्क आता ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. १ फेब्रुवारी पासून हे शुल्क लागू करण्यात येईल. त्यामुळे ताडोबातली जंगल सफारी आता सर्वसामान्य पर्यटकांना न परवडणारी होणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी जगभरातून ऑनलाईन नोंदणी केली जाते. साधारण व तत्काळ आरक्षणाचे शुल्क दुप्पटीने वाढवल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ताडोबातील नवे प्रवेश शुल्क
– सोम ते शुक्रवार : ४ हजार रुपये
– शनिवार आणि रविवार : ८ हजार रुपये
– जिप्सी चार्जेस : २२००
– गाईड : ३०० रुपये
येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव मिळाले. तर अंधारी वन्यजीव अभयारण्याला या अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या अंधारी नदीवरून नाव देण्यात आले. ताडोबा आणि अंधारी संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. महाराष्ट्रातील हा दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे. हिवाळ्यात हे जंगल हिरवाईने नटलेले असते, म्हणूनच या काळात पर्यटकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते.