चंद्रपूर मधून हरीश ससनकर उपस्थित
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शिक्षण क्षेत्रातील सुरु असलेल्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व नागरी संघटनांची एक ऐतेहासिक सभा 7 जानेवारी ला मुंबईत पार पडली, सभेत शासनाचे शाळा बंद धोरण, कंपनीला शाळा क्षेत्र खुले करणे व अन्य समस्यांवर चर्चा झाली, चंद्रपूर जिल्ह्यातून सभेला हरीश ससनकर उपस्थित होते.
अहमदनगर येथील सक्रिय शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी सदर सभेचे आयोजन केले होते, सभेला शिक्षक आमदार कपिल पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह शिक्षक संघटना प्रमुख पदाधिकारी, माध्यमिक ते प्राचार्य अश्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी नेते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र राज्यात शिक्षकांचे कैवारी समजणाऱ्या काही संघटनांच्या प्रमुखांनी सभेकडे पाठ फिरवली शिक्षक व विद्यार्थी हितापेक्षा आणखी काय अपेक्षा असेल या संघटनांची ते समजले नाही?
पुढे किती दिवस अनुदानित प्राथमिक शिक्षण टिकून राहील याची शंकाच आहे. नुकत्याच 10 पटाच्या शाळा बंद झाल्या या नंतर 30 पट व पुढे 150 पटाच्या शाळा बंद होणार आहे, फक्त 250 पट व पुढे 1000 पट अश्याच शाळा सुरु राहतील, सध्याच्या धोरणानुसार राज्यातील 80 हजार शाळा बंद होणार आहेत, याबाबत राज्याच्या सचिवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकूणच येणाऱ्या काळात राज्यातील गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील आणि शिक्षण ही श्रीमंतांचीच जहागिरी होऊन जाईल. या धोरणाचा पुरोगामी शिक्षक समितीने जाहीर निषेध केला आहे. तरुण शिक्षकांनाही या धोरणाचा मोठा फटका बसणार आहे.
सभेत राज्यातून दुरदुरुन शिक्षणाचा कळवळा असलेली मंडळी सहभागी झाली, ज्यांचा प्राथमिक शिक्षणाशी व सरकारी शिक्षणाशी फारसा संबंध नाही तेही आवर्जून आले, शिक्षकेत्तर आले, समाजवादी आले, विद्यार्थी आले, पालक आले, शिक्षणतज्ज्ञ आले..
सर्वात प्रभावी मार्गदर्शन शिक्षणतज्ज्ञ प्रा.रमेश जोशी सर यांचे झाले, गेली अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकार मधील चुकलेल्या लोकांची कशी चिरफाड करत आले याबाबत त्यांनी दमदार मत मांडले, शिक्षण हक्क कायदा लागू करण्याचा लढा, शेवटच्या शिक्षकाला स्थायी करेपर्यंतचा वस्तीशाळा शिक्षकांचा लढा, 75 वर्षाचे हे कधीही प्राथमिक शिक्षक नसलेले गृहस्थ प्राथमिक शिक्षण टिकावे म्हणून तिळ तिळ तुटत आहे, भांडत आहे व्यवस्थेविरुद्ध ! हे पाहून सामान्य शिक्षकांचा काम करण्याचा जोश आणखी वाढला.
नेहमी शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे आमदार कपिल पाटील यांनीही या मुद्यावर सरकारला धारेवर धरण्याचे आश्वासन दिले, यापुढील लढ्यात ते व त्यांची संघटना सोबत राहणार आहे. पुरोगामी चे प्रसाद पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांचा आवाज दाबणाऱ्या यंत्रणेचा निषेध केला, गुणवत्ता पूर्ण व निकषात न बसणाऱ्या शाळा कश्या बंद करता? असा खडा सवाल शासनाला करत याविरुद्ध पुढील प्रत्येक आंदोलनात पुरोगामी संघटना सहभागी राहील असे आश्वासन दिले. सभेत सर्वांनी आपली मते मांडली, सर्वांनी शिक्षण क्षेत्राची होत असलेली वाताहत स्पस्ट केली व मोठ्या लढ्याची गरज व्यक्त केली. या साखळीतील पुढचा टप्पा म्हणजे राज्यात सर्वांना या प्रश्नावर खडबडून जागे करण्यासाठी पुणे येथे एका शिक्षण परिषदेचे आयोजन करणे व त्यापुढे राज्यभर मोठे आंदोलन छेडने असा राहणार आहे. सभेलाबृहन्मुंबई शिक्षक सभा, पुरोगामी शिक्षक समिती, शिक्षक भारती, एकल संघटना, अ.भा. समाजवादी अध्यापक सभा, शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ, जुनी पेन्शन हक्क संघटना, रात्र प्रशाला मु.अ. संघटना, अ.महा.उर्दू संघटना, महा.राज्य लोकशाही आघाडी, राज्य संस्थाचालक संघटना, छात्रभारती व अन्य विद्यार्थी संघटना उपस्थित होत्या.
अजूनही वेळ गेली नाही अन्य संघटनांनी श्रेयवाद बाजूला ठेऊन राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन होणाऱ्या या संयुक्त लढ्यात सहभागी व्हावे, एकट्या शिक्षक संघटना किंवा समन्वय समित्या शासनाचे असे शिक्षण नष्ट करणारे निर्णय बदलवू शकणार नाही. या सभेचे फलित म्हणजे शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले गेले की आता शिक्षक एकटे नाही समाज पण सोबत येणार आहे.