गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर हे या संमेलनाचे उदघाटक
नागपूर/प्रतिनिधी: यावर्षीचे १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन येत्या २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून मेंढा-लेखा या गावी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भास्कर पेरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर हे या संमेलनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहतील. २७ जानेवारीला ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या दारी’ या नवीन उपक्रमातून या संमेलनाची सुरुवात होणार असून आयोजक पदाधिकारी राष्ट्रसंतांच्या मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाळा महाविद्यालयात जाणार आहेत. याअंतर्गत पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. २८ जानेवारीला मेंढा-लेखा या गावी प्रत्यक्ष संमेलन होणार असून यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. यादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाव्रती पुरस्कार वितरण, परिसंवाद, मुलाखती, मनोरंजनातून प्रबोधन असे कार्यक्रम होणार असल्याचे रक्षक यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात राष्ट्रसंतांची ग्रामगीतेचा समावेश करण्यात आल्यानंतर अशा संमेलनाची संकल्पना पुढे आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर चिंतन मंथन व्हावे व या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी १९९६ पासून राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. डॉ. सुभाष सावरकर हे पहिले संमेलनाध्यक्ष व डॉ. मधुकर आष्टीकर हे उदघाटक होते. त्यानंतर राष्ट्रसंत साहित्य संमेलनाला सर्वच स्तरातून प्रतिसाद वाढत गेला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठ स्तरावर पाच संमेलने घेण्यात आली. भारतीय विचारमंच या संस्थेनेही संमेलन आयोजनात मोलाचा वाटा उचलला. गावोगाव राष्ट्रसंतांचे विचार पोहचावे हा या संमेलनामागचा उद्देश असल्याचे रक्षक यांनी स्पष्ट केले.