Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७

अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

नागपूर : अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते. मात्र, पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
दामोदर साधू बेंदरे (५५, रा. बडेगाव, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दामोदर बेंदरे हे सायकलने शेतातून घरी परत येत होते. दरम्यान, गावाजवळ रेती घेऊन जात असलेल्या एमएच-४०/वाय-३९०० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या सायकलला मागून धडक दिली. ट्रकचे समोरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले तर सायकल काही दूरवर फरफटत गेली. अपघाताच्या आवाजाचे गावातील चौकात बसलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढला. नागरिकांनी बेंदरे यांनी लगेच नजीकच्या रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
रेतीवाहतुकीला आधीच विरोध असल्यामुळे या अपघाताने नागरिक संतप्त झाले. काहींनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ट्रकच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्यातच काहींनी रोडवर टायर पेटविले होते. या प्रकारामुळे बडेगाव येथे तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. या अपघातामुळे बडेगाव - टेंभूरडोह मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होता. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकचालक सावन राजू वासनिक (२८, रा. कोराडी, ता. कामठी) यास नंतर अटक केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.