मजूरीसाठी मजूरांचा असोलामेंढा प्रकल्प कार्यालयात ठिया
गोसीखुर्द प्रकल्पात मजूरीचे कामे करणा—या मजूरांचे लाखो रूपये बळकाविण्यांचा प्रयत्न करणा—या के.सी.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मजूरी काढून द्यावी या मागणीसाठी देउळगांवच्या मजूरांनी आज मूल येथील गोसीखुर्द प्रकल्प कार्यालयात श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात ठिया आंदोजन सुरू केले असून, मजूरी मिळेपर्यंत कार्यालयातच मुक्काम ठोकण्यांचा निर्धार केला आहे.
श्रमिक एल्गारच्या महासचिव छाया सिडाम, संगीता गेडाम यांचे नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.आंदोलनाला मूलचे उपविभागीय अधिकारी खेळकर, तहसिलदार सरवदे यांनी भेट देवून मजूरांच्या मागण्या रास्त असल्यांचे मान्य करीत, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
एप्रिल 2017 मध्ये देउळगांवच्या 8 मजूरांनी गोसीखुर्द प्रकल्पातील नहरावर डांबर फिलींगचे काम केले. काम पूर्ण झाल्यानंतरही के.सी.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीने मजूरांची मजूरी देण्यांस टाळाटाळ केली. 'आम्ही मजूरी देणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा' असा दमही या कंपनीच्या अधिका—यांनी दिल्यांने, या मजूरांनी मजूरी काढून देण्यांसाठी श्रमिक एल्गारकडे धाव घेतली. या मजूरांची मजूरी देण्यात यावी अशी कार्यकारी अभियंता, असोलामेंढा प्रकल्प कार्यालय, मूल यांचेकडे श्रमिक एल्गारने मागणी केली, मात्र ही बाब कंत्राटदाराची असल्यांचे सांगून कार्यकारी अभियंता बगमारे यांनी आपले हात झटकले. कंत्राटदारांनी, या मजूरांना, आपला बील निघाला नसल्यांचे कारण सांगून, आपले हात झटकले.
दिनांक 7 डिसेंबर रोजी श्रमिक एल्गारने बगमारे यांना घेराव करताच, त्यांनी दिनांक 15 डिसेंबर रोजी संबधीत कंत्राटदारास लेखी पत्र देवून, कार्यालयात येवून प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे आदेश दिलेत, मात्र लेखी पत्राप्रमाणे कंत्राटदार हजर झाले नाही. कार्यकारी अभियंता बगमारे आज कार्यालयात आले नाही. कंत्राटदार व आपण हजर राहू शकणार नाही याची पूर्वसुचनाही त्यांनी या मजूरांना किंवा प्रशासनाला न दिल्यांने मजूरांनी मजूरीसाठी कार्यालयात आले. कंत्राटदार व कार्यकारी अभियंता जोपर्यंत मजूरी देत नाही, तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली.
सायंकाळी तहसिलदार सरवदे यांनी या मजूरांची भेट घेवून, मजूरांवर अन्याय होत असल्यांची भावना व्यक्त करीत, सकाळ पर्यंत मजूरी देण्यांची कार्यवाही करण्यांचे आश्वासन दिले.मजूरांची मजूरी मिळावी यासाठी पोलिस प्रशासनही प्रयत्न करीत आहेत.