Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २३, २०१७

मेयोला 50 कोटीचा निधी

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची दरी दूर करणार 



नागपूर : ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची दरी दूर करण्यासाठी तसेच गोरगरीबांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केल्यानंतर किमान दोन ते पाच वर्ष ग्रामीण भागात सेवा द्यावी. ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा दिल्यास जीवनातील सर्वोच्च आनंद आणि समाधान मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंत्रसामुग्री आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, सर्वश्री आमदार विकास कुंभारे, डॉ. मिलींद माने, सुधाकर देशमुख, उपमहापौर दीपराज पार्डीकर, लाईफ अगेन्ष्ट कॅन्सरच्या संस्थापक अभिनेत्री गौतमी, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव संजय देशमुख, संचालक प्रवीण शिंगाळे, सहसंचालक प्रकाश वाकोडे, अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, ॲल्यूमिना असोशिएशन प्रमुख डॉ. आनंद पांगारकर आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन श्री. फडणवीस म्हणाले की, एखाद्या महाविद्यालयाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य समजून घेण्यासाठी अशा कार्यक्रमाचे औचित्य आवश्यक असते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतांना या रुग्णालयाशी अतिशय जवळचा संबंध आला. अपुऱ्या सुविधांमुळे या रुग्णालयाच्या व्यवस्थेवर ताण येत होता तरी त्यावेळेसचे डॉक्टर्स परिस्थिती समजून काम करायचे. या रुग्णालयामुळे नागपूर व नागपूरच्या आसपासच्या भागातील मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश राज्यातील रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध झाली. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर या रुग्णालयांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णालयात यंत्रसामुग्री आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वैविध्यपूर्ण आजारावर उपचार करण्याची संधी मिळते. आपात्कालीन परिस्थिती हाताळणाचे कौशल्य याच महाविद्यालयातून विद्यार्थी शिकू शकतात. सामाजिक जीवनाशी या रुग्णालयाचा जवळचा संबंध आहे. अतिशय चांगल्या वैद्यकीय सेवा हे महाविद्यालय रुग्णांना पुरविते. या सुवर्ण महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने अनेक माजी विद्यार्थी या महाविद्यालयात व्यतीत केलेल्या काळातील आठवणीने भावविभोर झाले आहेत. त्यांच्याकडे पाहून या वास्तूला सुध्दा आनंद होत आहे. येथून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय सेवा द्याव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.

या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात महाविद्यालयाच्या 50 वर्षाच्या उन्नतीचा आलेख मांडणाऱ्या स्मरणिका आणि सिकलसेल आजारावर प्रतिबंधात्मक उपचार देणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत सलग दोन वर्ष सिकलसेल आजारावर पेपर सादर करणारी विद्यार्थीनी संजना जैयस्वाल आणि माजी विद्यार्थी डॉ. कृणाल खोब्रागडे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी केले यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आमदार डॉ. मिलींद माने यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार विकास कुभांरे, डॉ. आनंद पांगारकर यांची समायोचित भाषणे झालीत. सूत्रसंचालन श्रीमती सुषमा यांनी तर आभार डॉ. रवि चव्हाण यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.