Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

‘लाईफस्टाईल’मध्ये आमूलाग्र परिवर्तन


नागपूर : नोकरीवर जाण्यासाठी प्रवासाला लागणारा वेळ, गर्दी, प्रवासाचा खर्च, अपघाताचा धोका, महिलांची सुरक्षा आणि प्रदूषण, या साऱ्या  समस्या मेट्रोमुळे दूर होतील. स्वस्त प्रवासभाडे, सर्व स्तराची कनेक्टीव्हिटी, मेट्रो स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी फीडर सुविधा आणि जागतिक स्तराच्या सुविधांमुळे गरीबच नाही तर श्रीमंतही मेट्रोचा पर्याय निवडतील. मेट्रोमुळे नागपूरकरांच्या ‘लाईफस्टाईल’मध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल, असा विश्वास महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.


उन्नती फाऊंडेशन आणि छात्र जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा-मेट्रो : कल, आज और कल’ या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अजय संचेती, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री अनिस अहमद, वेदचे माजी अध्यक्ष विलास काळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ब्रिजेश दीक्षित यांनी सुरुवातीला मेट्रोची वर्तमान प्रगती आणि भविष्यातील सुविधांची माहिती दिली. शहराच्या आतमध्ये मेट्रोचे काम करणे एक आव्हान ठरले आहे. नागरिकांना या कामामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या वेगाने व लवकर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी रात्रंदिवस काम केले जात असून, २७ महिन्यात ५० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. निर्धारित पाच वर्षांत आम्ही काम पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी दिला.
कनेक्टीव्हिटी हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी नागपूरच्या चारही भागाला असलेले औद्योगिक क्षेत्र निवासी क्षेत्राला जोडण्यात आला आहे. शिवाय रेल्वेस्टेशन, सर्व बसस्थानके, शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्था मेट्रोशी जोडण्यात येत आहेत. या संपूर्ण डिझाईनसाठी भारतातील आयटी तज्ज्ञांची मदत घेतली आहे. हे डिझाईन पेपरवर मॅन्युअली करण्याऐवजी संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असल्याने प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल आणि पैसाही वाचेल, असा विश्वास त्यांनी दिला. मात्र यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा राखला जाईल. प्रकल्पाची सौर ऊर्जा प्रणाली यातील महत्त्वाचा भाग आहे. मेट्रोचे ६५ टक्के काम सौर ऊर्जेवर चालेल. त्यासाठी प्रत्येक स्टेशनची निर्मिती करतानाच सोलर पॅनल बसविले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत खर्च वाचणार असून, त्याचा उपयोग इतर सोयीसुविधांसाठी होईल. प्रत्येक स्टेशनपासून ५०० मीटरचा परिसर मेट्रो स्वत:च विकसित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.