चंद्रपूर/प्रतिनिधी:
भंडारा येथील विदर्भ साहित्य संघ शाखा, सार्वजनिक वाचनालय आणि युगसंवाद या वाङ्मयीन चळवळी तर्फे मागील वर्षी पासून वेगवेगळ्या कवींची मुलाखत, त्या कवींचे काव्यवाचन आणि त्या कवितांवर समीक्षा असा उपक्रम सुरु असून विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात मान्यवर कवींना यात आपल्या कविता सादर करता आल्या आहेत. त्याचाच शेवटचा 12 वा भाग रविवार दिनांक 12 नोव्हेंबर 2017 ला होणार आहे. दुपारी 12 वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात होणाऱ्या या शेवटच्या भागात चंद्रपूरच्या प्रसिद्ध युवा कवयित्री डॉ पद्मरेखा धनकर या निमंत्रित असून त्यांची मुलाखत चंद्रपूरच्या साहित्यिक क्षेत्रातील अग्रणी नाव असलेले निवेदक आणि प्रख्यात युवा कवी इरफान शेख घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि कवी डॉ राजन जयस्वाल राहणार असून मुलाखतीनंतर पद्मरेखा यांचे काव्यवाचन झाल्यावर त्यांच्या कवितांवर प्रा रेणुकादास उबाळे आणि प्रा सावन धर्मपुरीवार चर्चा करतील. इरफान शेख आणि पद्मरेखा धनकर हे दोन्ही नाव चंद्रपूरच्या काव्यक्षेत्रातले उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्वे असून दोघांच्याही कविता महाराष्ट्रातील नामवंत दिवाळी अंक आणि नियतकालिकांतून प्रकाशित होतात. दोघेही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित झाले असून त्यांच्या कवितांना रसिकप्रियता लाभली आहे. त्यामुळे सदर कार्यक्रम श्रवणीय असेल. तरी साहित्यरसिकांनी व कवींनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ अनिल नितनवरे आणि प्रमोदकुमार अनेराव यांचेसह भंडारा येथील तिन्ही संस्थेच्या आयोजकांनी केले आहे.