Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

कविवर्य सुरेश भट सभागृह उभारल्याचे सार्थक - केंद्रीय परिवहनमंत्री गडकरी

नागपूर : कालिदास समारोहाला रसिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ‘कविवर्य सुरेश भट` सभागृह उभारले त्याचे सार्थक झाले, अशी भावना केंद्रीय परिवहन महामार्ग, जहाजबांधणी, जलस्त्रोत व गंगा शुध्दीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महापालिका यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कालिदास समारोहाची आज सांगता झाली. गेल्या दोन दिवसाप्रमाणे आजही या समारोहाला मोठा प्रतिसाद लाभला. या प्रतिसादाचा उल्लेख करुन गडकरी यांनी भव्य सभागृह उभारले, त्याचे सार्थक झाले अशी भावना व्यक्त केली. सभागृह उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला.

कविवर्य सुरेश भट सभागृह माफक दरात उपलब्ध करुन देण्याची भूमिका स्पष्ट करताना गडकरी यांनी नागपूरातील साहित्य, संस्कृती, काव्य, संगीत, नाटक आदी कलांना बहर यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सभागृहाची विजेची गरज सौरऊर्जेच्या माध्यमातून भागवण्यात येत आहे, त्यामुळे सभागृह माफक दारात उपलब्ध करुन देणे शक्य होत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी गडकरी यांच्या हस्ते क्रिएशन ऑफसेटचे तरुण उद्योजक स्वप्नील पंचभाई व श्रीमती श्वेता पंचभाई, आकांक्षा अग्रवाल, संदिप बारस्कर, जहिर भाई, श्रीमती शुभांगी गाडेकर, निवेदक जैनेंद्र सिंह व श्रीमती रेणुका देशकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. विभागीय आयुक्त यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमानंतर पंडीत सतीश व्यास आणि पंडीत रोणू मझूमदार यांनी संतूर व बासरी वादनांची जुगलबंदी सादर केली. वसंतरास समुह ओडिशी नृत्य बिन्दु जुनेजा आणि त्यांचा ग्रुप, शास्त्रीय गायनाची जुगलबंदी ऋतुरंग पंडीत संजीव अभ्यंकर व श्रीमती अश्विनी भिडे-देशपांडे यांनी सादर केले या कलावंतांचे आणि त्यांचे साथीदारांचे नितीन गडकरी आणि सौ. कांचन गडकरी यांनी स्वागत केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.