भामरागड /प्रतिनिधी-
उपविभागांतर्गत ताडगाव पोलिस मदत केंद्रातील ताडगाव ते पेरमिली मुख्य मार्गावर नक्षल्यांनी बॅनर लावून तसेच पत्रके टाकून त्याखाली पेरून ठेवलेली ८ किलो भू-सुरूंग स्फोटके पोलिसांनी नष्ट केली. पोलिसांच्या सतर्कतेने कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस उपअधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्वात क्युआरटी भामरागड, पोलिस मदत केंद्र ताडगाव व सीआरपीएफच्या जवानांना नक्षल्यांनी ताडगाव - पेरमिली मार्गावर बॅनर लावून तसेच पत्रके टाकून त्याखाली भू-सुरूंग स्फोटके पेरून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस जवानांनी घटनास्थळ गाठून नक्षल्यांनी बॅनर जवळ जमिनीत पेरून ठेवलेले अंदाजे १-१ किलो वजनाचे ५ ब्लास्ट, ३ किलो वजनाचा १ ब्लास्ट असे एकूण ८ किलो वजनाचे ६ ब्लास्ट प्राणहिता बीडीडीएस पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हिवरकर यांच्या मदतीने जागेवरच नष्ट केले.
सदर कामगिरी भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस उपनिरीक्षक राजरत्न खैरनार, क्युआरटी पथक भामरागड, ताडगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक होनमाने, सीआरपीएफ सी-९ चे असिस्टंट कमांडंट मुनीर खान यांनी चोख बंदोबस्त लावून कुठलीही जिवीतहानी व वित्ताहनी न होवू देता यशस्वीरित्या पार पाडली.