Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १२, २०१६

वाघांसह शेतकरी संरक्षणही महत्वाचे

- बंडू धोतरे

गोंडपिंपरी तालुक्‍यात घनदाट जंगल आहे. कुशीत अनेकांच्या उपजिविकेची शेती आहे. त्यात राबून उत्पन्न घेतले जाते. मात्र, जंगलाच्या शेजारची ही शेती वन्यप्राण्यांमुळे नष्ठ होत आहे. रात्रीच्या वेळी वन्यजीव शेतात येतात. पिकांची नासाडी करतात. हे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासला, वैतागला. वन्यप्राण्यापासून या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने शेतीभोवती वीजतारांचे कुंपण केले. त्यास वीज प्रवाह सोडतात. एक नोव्हेंबरच्या रात्री वीजप्रवाह सुरू करून शेतकरी घरी परतला. आतातरी वन्यजीव नासधूस करणार नाहीत, या आशेनं तो रात्रभर निवांत झोपला. पण, एक चिंत वारंवार सतावत होती. कुण्या मनुष्याला वीजेचा धोका होऊ नये, म्हणून वीजप्रवाह सकाळीच बंद करणे गरजेचे होते. त्यासाठीच तो सकाळीच उठला. त्याने शेत गाठले. धुऱ्यावर गेला. येथील चित्र बघून धक्का बसला. हा नुसता धक्का नव्हता, तर त्याच्या हातून झालेला खून होता. कुंपणच्या जवळच जंगलाचा राजा पडला होता. तो मृतावस्थेत होता. इतक्‍यात व्यायामासाठी निघालेले तरुण आले. त्यांना हकीगत सांगितली. त्या वाघास रस्त्याच्या कडेला झाकून ठेवले. नंतर, दिवसभरात शेतातच गड्डा खोदला. रात्रीच्या वेळेस सदर युवक व शेतमालकाचे दोन नातेवाईकांच्या मदतीने मृत वाघास ओढत नेले. खड्डयात पुरले. पुरावे नष्ट करून गुन्ह्यापासून दूर पळण्यासाठी ते वाट शोध होते.
तीन नोव्हेंबरच्या दुपारी परिसरात काणकुण सुरू झाली. वाघ मेला, वाघ मेला बायामाणसं बोलू लागले. चर्चा गावभर झाली. पण, खात्रीशिर माहिती नव्हती. चार नोव्हेंबरला गावाचे नावे चर्चेत आले. वनविभाग खळबळून जागे झाले. इकडे शेतमालकाची धाकधूक वाढली होती. उद्या घटना उघड झाली, तर आपले काही खरे नाही, याची कल्पना त्याला आली. तो वनविभागाच्या कार्यालयात आला. छातीवर हात ठेवत हिंमत केली. घटनेची कबुली दिली. वीजप्रवाहाने वाघ मेला जी!, असे तो सांगत होता. वनाधिकारी घामघूम झाले. आता चौकशी लागणार, पंचनामा होणार? अगदी तसेच झाले. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुजविलेला खड्डा खोदला. माती बाहेर काढली. बघतात तर काय वाघाचा मृतदेह होता. आरोपी शेतकऱ्यास ताब्यात घेतले. गुन्हा नोंद केला. वाघाचे शव वैद्यकीय तपासणीसाठी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

विज प्रवाहाने वन्यप्राणी मारण्याच्या घटना चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहासात नव्या नाहीत. पण, अशा पद्धतीने अवैधरित्या विज प्रवाह सोडण्याच्या कृत्याचे कुणीही समर्थन करणार नाही. परंतु, अश्‍या घटनेत वाघ काय, कुठलेही वन्यप्राणी मारले जाणार नाही याकरीता प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाघ आणि शेतकरी दोन्ही वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले, तरच जिल्ह्यात व्याघ्र संवर्धनाची चळवळ यशस्वी होऊ शकते.
काही फायदेशीर मुद्दे
  • 1. शेतकरी शेतपिक नुकसानीच्या समस्येपासून मुक्त होतील
  • 2. मोठ्‌या प्रमाणात शेतपिक वाटपाची गरज वनविभागास पडणार नाही
  • 3. वन्यप्राणी मृत्यूच्या घटना घडणार नाहीत
  • 4. शेतपिक नुकसानी वाचल्याने पीक उत्पन्न दुपटीने वाढ होण्याची शक्‍यता
  • 5. शेतपिक सुरक्षित राहत असल्याने काही शेतकरी बांधवाना दुबार पीक घेण्याची संधी मिळणार
  • 6. वाघ-वन्यप्राणी आणि वनविभाग कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत मिळेल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.