Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०४, २०१७

सप्रेम पत्र



मित्रांनो,

आज म्हणजे चार जानेवारीला मी वयाची ८४ वर्षं पूर्ण करून नववर्षात प्रवेश करतोय! तारेवरून संथपणे ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबांप्रमाणे इतकी सारी वर्षं अंगावरून ओघळून गेलीत! या क्रमात लवकरच केंव्हातरी पुढला क्षण नसणारा एक दिवस येणं ठरलेलं आहे. याचा अर्थ जी.ए. म्हणतात त्या प्रमाणे जीवनात 'स्वभाव आणि आयुष्य यांच्या मर्यादा ओळखून सारे आवरत येण्याचा काळ कधी तरी अटळपणे येतोच' जो आता माझ्या बाबतीत आलाय!  वयाच्या आणि मनाच्या अशा अवस्थेत साऱ्या गतायुष्याचे एक-वाक्यी सार आपल्याला सांगता येईल का ही उत्सुकता मनात ज्या क्षणी जागली त्या क्षणीच 'इट वॉज गुड टु लिव्ह' म्हणजे 'जगणं समाधानदायी होतं' हे सारांशदायी फ्लॅशी वाक्य मनात तरळून गेलं, आणि पाठोपाठ आपल्या असल्या जगण्यामागच्या सारसुत्राची यशोtगाथा म्हणून नव्हे तर केवळ प्रायोगिक 'डाटा' म्हणून जाहीर वाच्यता करावी असा अनावर मोह झाला.

वरील संदर्भात अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे मी आयुष्यभर मनात आलं त्या प्रमाणे अविवेकी आणि बेछूटपणे वागलोय. इतक्या धाडसातून मी तगून उरलोय हे माझंच मला नवल आहे. ऐन पंचविशीत अत्यंत अनपेक्षितपणे मी सुरक्षित अशा मध्यमवर्गीय हमरस्त्यावरून म्हणजे 'हाय वे' वरून अचानकपणे आडमार्गावर म्हणजे 'माय वे' वर फेकला गेलो. त्या बदलानंतर आजपर्यंत मी जसा जगलो आणि त्यातून तगलो त्याचं यथातथ्य वर्णन असणारी म्हणून माझं जीवनगाणं  झालेली वसंत सावंतांची एक कविता मुद्दाम खाली देतो आहे.

"सभोवती जग फिरत असते आपल्याच नादात एक युगांत होत असतो
 त्याचे पडसाद उमटत राहतात जीवनभर ; मी वाट लटपटत चालत असतो
 समोर भन्नाट माळ आणि ग्रीष्माचा झळाळ, खोल वणवा लागलेला
 कोणी नसतो आसपास, पाठीवर ओझे आणि अक्षितिज मी एकटाच चाललेला

कुणाला हाक मारावी असा कुणी नाही जवळ, रक्ताचे नातेवाईक दूर
मतलबी आशांचे पुतळे, तयाची सहानभूती खोटी; कसे भरून आले ऊर
अशा वेळी गेंड्याची कातडीही फाटते.. सर्वभक्षक काळ जाणवत होता
एका अतर्क्य क्षणी मी सावरलो एवढे खरे, मला सावरणारा आत उभा होता"

थोडक्यात नियोजनपूर्वक म्हणजे पूर्ण विचारांती मी जीवनाची आखणी मुळीही केलेली नव्हती त्यामुळे जगलेल्या दीर्घ आयुष्यात जे घडत गेलं ते सारं जवळपास योगयोगी या नात्यानं अपघाती होतं. मात्र माझ्या आजवरच्या अश्या बेछूट जगण्यात कळत वा नकळत जे एक सूत्र उमटून आलेलं आज मला दिसतंय ते नेटक्या शब्दात सांगणारं सुचेता कडेठाणकरांचं एक वचन मला अलीकडेच योगायोगानं गवसलं. 'अपने होने पे मुझको यकीन आ गया' या गोबीच्या वाळवंटातल्या आपल्या धाडसी प्रवासावरच्या अनुभव लेखात त्या म्हणतात,""आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व क्षमता अजमावून बघण्याची संधी आपण स्वतःला किती वेळा देतो? संयम आणि संस्काराच्या आपण आखून घेतलेल्या मर्यादांमध्ये राहण्याच्या अट्टहासामुळे मर्यादांपलीकडे भासणाऱ्या काही गोष्टी करण्यासाठी आपण धजावताच नाही. आपल्याला असलेल्या या मर्यादा आहेत की आपल्या सोयीसाठी आपणच बांधून घेतलेले बांध आहेत, हे आपण पडताळूनच बघत नाही. आपल्यामध्ये असणाऱ्या प्रचंड शक्तीची जाणीव आपण स्वतःला होऊच देत नाही. आपल्या आयुष्यात आपल्या परीने अशक्य आणि अवघड  वाटणाऱ्या गोष्टी करून बघण्याची, आपल्या सोयीच्या आणि सवयीच्या त्या परिघातून बाहेर येण्याची थोडीशी तयारी दाखवली तर आपली आपल्या स्वतःलाच नवी ओळख होते."

वेगळ्या शब्दात आत्मभान येणे वा आत्मज्ञान होणे म्हणजेच कवी सावंत म्हणतात 'तो' आपल्या आत उभा असल्याची प्रचिती येणं! विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञानं आपल्या 'व्हेरायटीज ऑफ रीलिजस एक्स्पेरिअन्स' या गाजलेल्या ग्रंथात या मानसिक परिवर्तनाला धार्मिक परिभाषेत 'कॉन्व्हर्शन' म्हटलेलं आहे. अर्थात या साठी यातनामय नाईलाजांची किंमत मोजावी लागते! शॉर्ट कट असा नसतोच! असो!

मनोहर सप्रे


साभार फेसबूक

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.