Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०२, २०१५

विकासकामावरून भाजपा-कॉंग्रेस आमने-सामने

राजुरा शहरातील समस्या व विकास कामावरून आजी-माजी आमदारांत आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे. शहर कॉंग्रेस कमेटी व राजुरा भारतीय जनता युवा मोर्चाने लावलेल्या बॅनरमुळे सध्या शहरात राजकीय वातावरण  तापले आहे.

शहर कॉंग्रेस कमेटीने काही दिवसांपूर्वी शहरात ‘कुठे नेऊन ठेवलाय राजुरा माझा?’ या शिर्षकाखाली शहरातील समस्यांना वाचा फोडली आहे. त्यामध्ये ‘पावसाचा थेंब जमिनीवर पडत नाही, तर लाईट जाते, झाडाच पान हालत नाही, तरी लाईट जाते’, ‘राजुरा ते बामणी फक्त ७ कि. मी. रस्ता परंतु सध्या तो इतका सुंदर आहे, की तो पार करायलाच अर्धा तास लागतो’, ‘वर्धा नदीवरील पूल, तर सध्या तेथील खड्ड्यांमुळे स्विमिंग पूल झाला आहे, मासे नदीत राहण्याऐवजी त्या पुलावरील खड्ड्यातच राहतात’, ‘रेल्वे ओवरब्रिज, तर विचारूच नका पूल बनवत आहे, की जगातल आठवा आश्‍चर्य हेच कळत नाही’, अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये हे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसने या विविध समस्यांवर केलेल्या टिकात्मक प्रश्‍नांना भाजयुमोनेही बॅनरच्या माध्यमातूनच चोख उत्तर दिले आहे. त्यावर माजी आमदारांच्या कार्यकाळात त्यांनी खर्च केलेल्या ५०० कोटींच्या निधीवर आक्षेप घेतला आहे. ‘५०० कोटी खर्च केले असते, तर रस्त्याची ही हालत झाली नसती’ या शिर्षकाखाली चक्क माजी आमदारांच्या विकासकामांना आव्हान दिले आहे. राजुर्‍याची वाढती विज पुरवठ्याची मागणी लक्षात घेता फक्त राजुरा शहरासाठी वेगळे विद्युत केंद्र उभे केले असते, विद्युत अधिकारी व कर्मचारी दिले असते, तर वार्‍याने लाईन गेली नसती, असा टोला लगावला आहे. रस्ते दुरुस्ती व विजेची कामे आम्ही अवश्य करू असेही या बॅनरमध्ये नागरिकांना आश्‍वासन देण्यात आले आहे.

जेथे कॉंगेसने बॅनर लावले आहे, तेथे भाजपानेही आपले बॅनर लावले आहे. त्यामुळे बॅनरच्या माध्यमातून आजी-माजी आमदार आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा शहर विकासासाठी १०० कोटींचा निधी २००९ ते २०१४ मध्ये खर्च केल्याचा दावा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ६६६ कुटुंबीयांना घरकुल मंजूरी, राजुरा-बल्लारपूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, राज्य सरोवर व संवर्धन योजनेंतर्गत न. प. राजुरा तलाव सौंदर्यीकरण, वनोद्यान सौंदर्यींकरण, प्रशासकीय इमारत बांधकाम, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह बांधकाम, सोमेश्‍वर मंदिराचे जतन व दुरुस्ती, ११ खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, राजुरा शहराच्या विविध विकासकामांकरिता कोट्यवधीचा निधी तसेच राजुरा विधानसभेत ५०० कोटी निधींचा खर्च एवढे विकासकामे पाठिशी असूनही राजुरा विधानसभेत कॉंग्रेसला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्या तुलनेत राजुरा विधानसभेत पहिल्यांदा सत्तेत आलेल्या भाजपाची कासवगतीने विकासकामांकडे वाटचाल होत आहे. कामांना गती देण्याचे आश्‍वासन पूर्णत्वास नेण्याचे आमदार ऍड. संजय धोटे यांचे म्हणणे आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, त्यात कॉंग्रसने केलेल्या दाव्यात काही अंशी सत्यता असली तरी पहिल्यांदा सत्तेत आालेल्या भाजपाने या सर्व समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

एकूणच राजुरा विधानसभेत माजी आमदार सुभाष धोटे यांच्या विकासकामांचा झंझावात असताना अचानक सत्ता परिवर्तनानंतर समोर आलेल्या समस्यांमुळे रंगलेली ‘पोस्टर’वॉर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरीकडे नुकत्याच सत्तेत आलेल्या भाजपाने कासवगतीने केलेली सुरुवात कॉंग्रेसच्या रडारवर आहे. त्यामुळे पुढेही अशीच ‘पोस्टर’वॉर मोठ्या प्रमाणात रंगणार असल्याची चर्चा शहरात जोमाने सुरू आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.