Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०७, २०१४

नगर पंचायतींच्या स्थापनेसाठी आक्षेप मागविले

जिल्ह्यातील आठ नव्या नगर पंचायतींच्या स्थापनेसाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नगर विकास विभाग मंत्रलायाने आक्षेपही मागविले आहेत.
प्रत्यक्षात नगर विकास मंत्रालयातून निघालेली ही प्रारूप अधिसूचना १ मार्च २0१४ या तारखेची आहे. या अधिसूचनेनंतर पाच दिवसांनीच म्हणजेच ६ मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे हा विषय थंड बस्त्यात पडला होता. निवडणुकीच्या निकालानंतर या प्रारूप अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असे दिसत आहे.
चिमूर येथील एका शासकीय समारंभासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता त्यांच्यासमोर नागरिकांनी चिमूर जिल्हा निर्मीतीची मागणी केली होती. त्यावर त्यांनी आपल्या भाषणातून चिमूरला नगर पंचायत स्थापन करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा ठरावही झाला होता. त्यात चिमूरसह अन्य शहरांचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार नगर विकास विभागाने ही आधिसूचना काढली आहे. या प्रारूप अधिसूचनेनुसार, ज्या तालुका स्तरावर नगर पालिका नाहीत, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे रूपांरत नगर पंचायत असे केले जाणार आहे. त्यासाठी सीमांकन, ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र, नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियमाच्या कलम ३४१ (क) चे पोटकलम (१), (१क) आणि (२) या नुसार अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागविण्यात आले आहेत. हे आक्षेप ३0 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात मागविण्यात आले होते. मात्र प्रारूप अधिसूचना निघाल्यावर आचारसंहीता लागल्याने हा विषय थांबला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे.
स्थापन केल्या जाणार्‍या नगर पंचायतीचे क्षेत्र दर्शविणारा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. शहर तालुका मुख्यालयाचे असले तरी कमी लोकसंख्येमुळे अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच अस्तित्वात आहेत. नगर पालिका स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा निकष महत्वाचा मानला जातो. मात्र, या गावांसाठी तो अडचणीचा होता. परंतु नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याने तालुकास्तरावरील नागरिकांची नाराजी दूर होणार आहे. नगरपालिका निर्मितीमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींवर हा नवा पर्याय मानला जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.