Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १९, २०१४

सूर्यांश साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

ना.गो.थुटे, श्रीपाद जोशी, प्रशांत मडपूवार, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, शेखर डोंगरेॅ


चंद्रपूर- सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबाबत देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. साहित्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या साहित्यिकांना हे पुरस्कार चंद्रपुरातील सूर्यांश संस्थेद्वारे सहा वर्षांपासून देण्यात येत असून हे पुरस्कार सन्मानाचे समजले जातात.
यंदाच्या सूर्यांशच्या पुरस्कारात विशेष साहित्य गौरव पुरस्कार ना. गो. थुटे, साहित्य सन्मान श्रीपाद प्रभाकर जोशी, नवोन्मेष पुरस्कार प्रशांत मडपूवार, स्व. दिलीप बोढाले स्मृती कलायात्री पुरस्कार डॉ. जयश्री कापसे-गावंडे आणि प्रा. शेखर डोंगरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दोन सदस्यीय निवड समितीने ही निवड केली असून मे महिन्यात दुसर्‍या आठवड्यात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ना. गो. थुटे झाडीपट्टीतील नामवंत कवी व लेखक असून त्यांची जवळपास चाळीस पुस्तके प्रकाशित झालीआहेत. विविध साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तीस वर्षांपासून ते सातत्याने लेखन करीत आहेत. श्रीपाद प्रभाकर जोशी चंद्रपुरातील प्रख्यात कवी व नाटककार असून त्यांच्या आकाश शोधतांना या नाटकाचा व एडका ए या कवितेचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. राज्य नाट्य स्पध्रेत त्यांच्या नाटकांना पुरस्कार प्राप्त झाले असून जोशी यांच्या 'चितपट' या नाटकाला नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांनी 'घर अण्णा देशपांडेचे' या नावाने व्यावसायिक रंगभूमीवर आणले. नाट्य लेखनासाठी व अभिनयासाठी त्यांना स्मिता पुरस्कारासहीत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे.
प्रशांत मडपूवार यांचा 'चार ओळी तुझ्यासाठी' हा चारोळी संग्रह, मन इंद्रधनु हा कवितासंग्रह प्रकाशित असून मन बावरे ही गीतध्वनीमुद्रिकाही प्रकाशित आहे. नाट्य अभिनयासाठी मडपूवार यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सतत प्रकाशित होतात. प्रा. डॉ. जयश्री कापसे-गावंडे ज्येष्ठ नाट्यकर्मी असून विविध नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकप्रिय आहेत.
नुकत्याच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चिंधी बाजार' या नाटकाने राज्य नाट्य स्पध्रेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रा. शेखर डोंगरे झाडीपट्टीतील ख्यातकीर्ती नाट्य कलावंत व नाटककार असून त्यांनी अनेक नाटकातून भूमिका साकारली आहे. तसेच नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. सूर्यांशच्या या कार्यक्रमाला या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या चाहत्यांनी व साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यांशचे सचिव मिलिंद बोरकर व बाबा खनके यांनी केले आहे. ल्ल

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.