मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्हाधिका-यांची धडक कारवाईबल्लारपूर मुख्याधिका-यास कारणे दाखवा नोटीस
चंद्रपूर-09- मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमादरम्यान बल्लारपूर येथील दोन मतदान केंद्रावर दारु पिऊन आलेल्या मतदान केंद्र अधिका-यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. तसेच बल्लारपूर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ पूर्व परवानगी न घेता मुख्यालयी अनुपस्थित राहिल्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करुन शिस्तभंगाची कारवाई का करु नये असे नोटीस जिल्हाधिका-यांनी त्यांना बजावली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवार 9 मार्च 2014 रोजी जिल्हाभरात मतदार नाव नोंदणी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी बल्लारपूर येथील काही केंद्राना अचानक भेटी देवून मतदार नोंदणी कार्यक्रमाची तपासणी केली. या दरम्यान जनता हायस्कुल डेपो साईबाबा वार्ड बल्लारपूर येथील केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी जगदिश कांबडे व 215 जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील मतदान केंद्र अधिकारी अतुल दुधलकर हे दारु पिऊन मतदान केंद्रात आल्याची माहिती मिळताच जिल्हाधिका-यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बल्लारपूर पोलीसांनी गुन्हे दाखल केले.
थापर हाऊस येथील मतदान केंद्राची तपासणी करतांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी भरुन देणा-या नमुना अर्ज क्रमांक सहा सोबत जोडलेल्या को-या रहिवाशी प्रमाणपत्रावर नगरसेवकाची स्वाक्षरी व शिक्का होता मात्र ज्यांना दाखला दिला त्याचे नाव दाखल्यावर नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देशनास आले. यावरुन थॉपर हाऊस येथील मतदान केंद्र अधिकारी रमेश पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सदर दाखला जप्त करुन चौकशी करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले.
जनता हायस्कुल डेपो येथील केद्र अधिकारी जगदिश कांबडे व जनता विद्यालय येथील केंद्र अधिकारी अतुल दुधलकर हे दारु पिऊन केंद्रात आल्याची माहिती तहसिलदार बी.डी.टेळे यांनी जिल्हाधिका-यांना दिली. यावर दोन्ही केंद्र अधिका-यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश म्हैसेकर यांनी दिले. यावरुन दोन्ही केंद्र अधिका-यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसिलदार बी.डी.टेळे यांनी दिली.
बल्लारपूर नगर परिषेदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ हे मुख्यालयी हजर नसल्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देशनास येताच निवडणूक कामामध्ये हयगय केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल करुन शिस्तभंगाची कारवाई का करु नये अशी नोटीस वाहुरवाघ यांना बजावण्यात आली. दरम्यान जिल्हाधिका-यांनी दुरध्वनीवरुन वाहुरवाघ यांची चांगली कान उघाडणी केली. कोणाच्या परवानगीने मुख्यालय सोडले हे लेखी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सोमवारी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष भेटून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश वाहुरवाघ यांना दिले.
मतदार शिक्षण व सहभागाच्या पध्दतशिर कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीस नवयुवक व महिलांनी भरघोष प्रतिसाद दिला. मतदार यादीत नाव असल्याची खात्री करुन घेणे व त्यानंतर अर्ज नमुना सहा भरुन देण्यासाठी सर्वच केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी चंद्रपूर, बल्लारपूर व राजूरा तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. यावेळी त्यांचेसोबत बल्लारपूर तहसिलदार बी.डी.टेळे हे होते.