Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १५, २०१४

कलामांच्या स्वाक्षरीसाठी 'तिने' केला आकांततांडव

चंद्रपूर : तीव्र इच्छाशक्ती बाळगा, यश आपोआपच पदरात पडेल असा सल्ला डॉ. अब्दूल कलामांनी युवकांच्या समुदायापुढे दिला आणि लगेच कार्यक्रमानंतर त्याचा प्रत्ययही येथील विश्रामगृहावर आला.

कार्यक्रमानंतर उपस्थितांचे अभिवादन स्वीकारत डॉ. कलाम उघड्या जीपने लगतच्याच विश्रामगृहावर परतले. त्यांच्या चाहत्या वर्गाने तिथेही गर्दी करण्याचा प्रयत्न केला. अशातच एक महाविद्यालयीन तरूणी हातात वही घेऊन लगबगीने पुढे सरसावली. तिला बघून पोलिसांनी रोखले. महिला पोलिसांनीही तिचे दोन्ही हात धरले. मात्र तिने बराच आकांततांडव केला. मला काही नको, फक्त कलाम साहेबांची स्वाक्षरी घेऊ द्या, असे तिचे म्हणणे होते. मात्र पोलीस काहीएक ऐकायला तयार नव्हते. अखेर तिने रडणेही सुरू केले. हा कोलाहल बघुन वाहनातून उतरून विश्रामगृहातील सुटमध्ये जाण्यासाठी वळलेले डॉ. कलाम थबकले. त्यांनी वळून बघीतले तेव्हा हा प्रकार दिसला. विषय लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरूणीला सोडण्याची सूचना केली. धावत येऊन तिने त्यांना नमस्कार केला आणि स्वाक्षरी देण्याची विनंती केली. तिची ही धडपड त्यांच्याही लक्षात आली. क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी तिच्या वहीच्या पानावर स्वाक्षरी दिली. एवढेच नाही तर, आयुष्यात नेहमी अशीच जिद्दीने वाग, असा सल्लाही तिला दिला. या तरुणीचे नाव मात्र कळू शकले नाही.
कलामांच्या स्वाक्षरीसाठी अनेकांची धडपड होती. पण एकदोघांनाच ही संधी मिळाली. समारंभातील प्रश्नोत्तरादरम्यान सायली नामक एका महाविद्यालयीन युवतीने त्यांच्या स्वाक्षरीसाठी आग्रह धरल्यावर अगदी मंचावर बोलावून त्यांनी तिला ऑटोग्राफ दिला. 
उघड्या जीपमधून परतताना गर्दीतील एका व्यक्तीने आपल्या लहानग्या मुलीला पुढे केले, तिच्या डोक्यावरही ममतेने हात ठेऊन त्यांनी आपल्या विनम्रतेचा आणि मायेचा परिचय घडविला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.