ताडोबाच्या बफर क्षेत्रात आगरझरी जंगल
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी संध्याकाळी हि गोष्ट उघडकीस आली. वनाधिका-यांच्या प्राथमिक अंदाजानुसार दोन वन्यजीवांच्या लढाईत घातक जखमा झाल्याने हा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेले महिनाभर वन्यजीव-मानव संघर्षात एकूण ८ बळी गेले आहेत. यातील बहुतेक घटना ताडोबा-अंधार व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील बफर क्षेत्रात घडल्या आहेत. या भागात आधीच बिबट्यांची संख्या अधिक आहे त्यात बाहेरच्या जंगलातून मानवावर हल्ला केलेल्या बिबट्यांना जेरबंद करून या जंगलात सोडले गेले. या नव्या बिबट्यामुले या भागात मानवावरील हल्ले वाढल्याचे बोलले जात होते. आजच्या घटनेने या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. बफर क्षेत्रातील आगरझरी जंगलात कक्ष क्र. १९० मध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. संध्याकाळी काही वनमजुरांनी वरिष्ठांना या बाबीची माहिती दिली. तातडीने पशुवैद्यकिय अधिका-यांना पाचारण करून शव विच्छेदन करण्यात आके. यात हि ५ ते ६ वर्षाची मादी बिबट असून तिचा अन्य एखाद्या वन्यजीवाशी झालेल्या लढाईत मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे.
या भागातील एकूण ३ बिबटे आधीच मानवावरील हल्ल्यांमुळे अधिका-यांनी पिंजरे लावून जेरबंद केले आहेत. त्यांना अद्याप जंगलात सोडण्यात आलेले नाहीत. त्यातच एखाद्या अन्य बिबट्याचा संघर्षात झालेला मृत्यू या भागात झालेली बिबट्यांची वाढ दर्शवित आहे. मात्र हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे निष्पन्न आगामी काळातच होईल.
एकूण ७ बळींसाठी जबाबदार असलेल्या बिबट्याचा मृत्यू झालाय का ? नव्या अधिवासात आपली जागा निश्चित करू न शकल्याने हे घडले का याचे उत्तर सध्या वनविभागाकडे नाही. सध्या बिबट्यांचे ग्रामस्थांवरील हल्ले थंडावले असले तरी आरोपी बिबट्या निश्चित न झाल्याने क्षेत्रातील नागरिकात संताप धुमसत आहे. अशातच ताज्या घटनेमागे काय कारण आहे हे महत्वाचे ठरणार आहे.