चंद्रपूर शहराचा पारा आज ४४ डिग्री पार करत असतानाच शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कोतपल्लीवार पेट्रोल पंपावर भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. हा पंप चंद्रपूरची मुख्य मशीद, स्टेट बँकेची मुख्य शाखा यांना लागून तर मुख्य बाजारपेठेच्या जवळ आहे.
आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास या पंपावर नेहमीप्रमाणे पेट्रोल tanker द्वारे भूमिगत टाकीत पेट्रोल भरण्याचे काम सुरु होते. सर्व सुरळीत सुरु असतान अचानक ठिणगी उडून tanker ने सर्वप्रथम आग पकडली. बघता -बघता आगीने रौद्ररूप धारण केले. चंद्रपूर शहराच्या आभाळात काळ्या धुराचे लोट दिसू लागले. या आगीमुळे पंपावरील भूमिगत इंधन टाकीतही स्फोट झाल्याचे कळते. तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र अरुंद रस्ते , वाहतूक व भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते यामुळे अग्निशमन बंब घटना स्थळी पोचण्यास विलंब झाला. एकूण ३ अग्निशमन बंबांनी तासभर परिश्रम करून आगीचा भडका नियंत्रणात आणला. आगीचे नेमके कारण काय हे मात्र कळू शकलेले नाही. सुदैवाने घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. अग्निशमन बंब पोचण्यास विलंब झाला असला तरी मनपाचे अधिकारी मात्र बंब वेळेवर पोचल्याचा दावा करत आहेत. अत्यंत वर्दळीच्या भागात असलेल्या अशा पंपांवर अग्निरोधक यंत्रणा का नव्हती ? Indian Oil चे अधिकारी व मनपा या बाबीकडे लक्ष देतील का? या घटनेतून काही बोध घेतला जाईल का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.