Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १३, २०१३

डॉ. तुमराम साहित्य अकादमीचे सदस्य


चंद्रपूर
आदिवासी साहित्याचे अभ्यासक आणि लेखक प्रा. डॉ. विनायक तुमराम यांची भारतीय साहित्य अकादमीच्या कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दहा सदस्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.
डॉ. तुमराम हे आदिवासी साहित्याचे अभ्यासक म्हणून सर्वपरिचित आहेत. आदिवासी साहित्यावर त्यांचे विपूल लेखन आहे. आदिवासी साहित्यावर अधिकारवाणीने बोलणारा वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. ' आदिवासी साहित्य : स्वरुप आणि समीक्षा ' हा त्यांचा आदिवासी साहित्यावरील समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहे. शतकातील आदिवासी कविता , क्रांतिवीर नारायणसिंह उईके हा चरित्रग्रंथ , ' गोंडवन पेटले आहे ' हा काव्यसंग्रह लोकप्रिय आहे. ' आदिवासी साहित्य : दिशा आणि दर्शन ' या अलीकडेच प्रकाशित समीक्षा ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेने नुकतेच पुरस्कृत केले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांची पुस्तके आणि कविता अभ्यासाला आहेत. केंद्र सरकारच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासोबतच राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कारही त्यांना मिळाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे अध्यापनाचे कार्य केल्यानंतर आता ते नागपूर येथे अभिनंदन कनिष्ठ महाविद्यालयात पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. साहित्य निर्मितीसोबतच त्यांनी सामाजिक कार्यातही मोलाचे कार्य केले आहे. आदिवासींच्या विकासासाठी अनेक सभा-संमेलने-मेळावे आयोजित केले आहेत. या निवडीच्या निमित्ताने आदिवासी समाजाला न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
साहित्य अकादमीच्या देशभरातील ८० सदस्यांपैकी १० सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत. यात प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे , समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे , अरुणा ढेरे , अविनाश सप्रे , रंगनाथ पठारे आदींचा समावेश आहे. मराठी , कोकणी आणि सिंधी या तीन भाषांतील साहित्याच्या अभ्यासाची आणि चिकित्सेची जबाबदारी महाराष्ट्रातील सदस्यांवर राहणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.