चंद्रपूर - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांना गती दया अशा सूचना खासदार हंसराज अहिर यांनी दिल्या. ते जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता व संनियत्रण समितीच्या सभेत बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुमरे, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, सर्व सभापती, समिती सदस्य व प्रकल्प अधिकारी अंकुश केदार यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मागील सभेच्या इतिवृत्तास मंजूरी देण्यात आली. यासभेत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भुमिअभिलेख्यांचे संगणीकरण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे मार्फत राबविण्यात येणा-या केंद्र पुरस्कृत योजना, राष्ट्रीय ग्रामीण जिवनन्नोती अभियान, इंदिरा आवास योजना व मागास क्षेत्र आमदार निधी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
पंचायत समिती मुल अंतर्गत टेकडी उश्राळा व पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत सिंगडझरी येथील पंधा-याचे काम निकृष्ठ झाल्याचा प्रश्न सदस्यांनी मागील बैठकीत मांडला होता. त्याच्या अनुपालन अहवालावर निर्णय देतांना अध्यक्षांनी त्रि सदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले. त्या सोबतच मुल तालुक्यात प्रादेशिक नळ योजने अंतर्गत टेकाडी प्राधिकरण योजने अंतर्गत 19 गावांच्या पाणी पुरवठयाबाबत निर्णय देतांना खासदार अहिर यांनी सर्वांनी पाणी मिळेल असे नियोजन करा अशा सुचना पाणी पुरवठा विभागाला दिल्या.
यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आढावा घेतांना खासदार म्हणाले की, मागेल त्यांना काम देण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार जिल्हयात कार्यवाही करुन जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल याचे नियोजन करा.
वीज बिल न भरल्यामुळे बंद पडलेल्या नळ योजना विषयी बोलतांना खासदार म्हणाले की, अशा योजनांची यादी विज मंडळाकडून मागवून घ्यावी व जिल्हा परिषदेच्या निधीतून ते अदा करता येतील का याबाबत तात्काळ माहिती सादर करावी जेणे करुन ऐन उन्हाळयाच्या दिवसात नागरीकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही. इंदिरा आवास योजनेची सर्व घरकुल मार्च 2013 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधीतांना दिल्या. बोरवेल वरील सौर दिवे जास्तीत जास्त प्रमाणात घेण्याबाबत त्यांनी सांगीतले.