Wednesday, July 13, 2011 AT 01:30 AM (IST)
चंद्रपूर - भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले असताना यंदा गणरायालाही महागाईचा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा श्रीगणेशाच्या छोट्या मूर्ती 50 रुपयांनी महागल्या आहेत.
यंदा श्रीगणेशाची स्थापना एक सप्टेंबर रोजी होईल. त्यासाठी मूर्ती कारागिरांनी गेल्या 15 दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. घरगुती प्रतिष्ठापनेच्या मूर्ती बनविणे सुरू आहे. 15 ऑगस्टपासून सार्वजनिक मंडळाच्या मागणीनुसार आणि पसंतीनुसार मूर्ती घडविण्याचे काम सुरू होईल. यंदा माती, रंग, कपडे, लाकूड, तणस आणि भुसा आदी वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. मूर्ती घडविण्यासाठी अत्यावश्यक असलेली माती यंदा सहा हजार रुपये ट्रॅक्टरप्रमाणे विकली जात आहे. गतवर्षी साडेचार हजार रुपये होती; मात्र इंधन आणि मजुरांचे दर वाढल्याने एक वर्षात दीड हजार रुपये भाववाढ झाली आहे. ही माती राजुरा तालुक्यातील विहीरगाव आणि सिंदेवाही तालुक्यातून आयात केली जाते. मातीच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीत 50 रुपये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेने घेतला आहे. त्यामुळे सर्वांत कमी दरातील 150 रुपयांच्या मूर्तीसाठी आता 200 रुपये मोजावे लागतील. एक हजार ते 10 हजार रुपये किमतीपर्यंतच्या मूर्तींमध्येही 150 ते 500 रुपये भाववाढ करण्यात आली आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस सुरूच
पर्यावरणास घातक असलेला प्लास्टर ऑफ पॅरिस बंद करण्यात यावे, यासाठी गेल्यावर्षी जनजागृती करण्यात आली होती. तेव्हा काही व्यावसायिकांनी विरोध केला होता. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असतानादेखील यंदाही काही ठिकाणी वापर सुरूच आहे.