Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर ०७, २००९

...अन्‌ आईचा आनंद गगनात मावेनासा झाला

...अन्‌ आईचा आनंद गगनात मावेनासा झाला
Saturday, October 10, 2009
Tags: chandrapur, politics, election, rahul gandhi ...
चंद्रपूर - तब्बल 25 मिनिटांच्या संवादामध्ये जनता तल्लीन झाली होती. मधेच कुठून तरी "राहुल गांधी आगे बढो'चा नारा येत होता. सभा संपली. राहुल गांधी मंडपाच्या मागून परतीकडे निघाले. काही दूर जात नाही तोच "ते' पुन्हा नागरिकांच्या गराड्यात शिरले. कुणी हातात हात देत होते, कुणी हात हलवून नमस्कार करीत होते. सुरक्षा कवच तोडून अचानक गर्दीत आलेल्या राहुल गांधींनी एका लहान मुलास कडेवर घेतले आणि त्याचे भाग्यच उजळले. राहुल गांधींनी आपल्या मुलाला कडेवर घेतल्याचा आनंद आईला गगनात मावेनासा झाला होता.

स्थानिक चांदा क्‍लब मैदानावर कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या राहुल गांधींनी आज (ता. नऊ) गांधी घराण्यावर प्रकाश टाकत "गरिबां'शी असलेल्या नात्यावर संवाद केला. दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आकाशातून हेलिकॉप्टरचा आवाज आला. बघताक्षणी पोलिस मैदानावर हेलिकॉप्टर उतरले. पाच मिनिटांतच पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले राहुल गांधी मंचावर दिसले आणि साऱ्या जनसमुदायाने "राहुल गांधी की जय हो', अशी एकच हाक दिली. स्वप्नातील शायनिंग इंडिया चंद्रपूरच्याही जनसागरात राहुल गांधींना कुठे दिसत नव्हता. यावेळी त्यांनी प्रामुख्याने गरिबांवरील प्रेम व्यक्त केले. सुमारे 25 मिनिटे भाषण दिल्यानंतर त्यांनी नागरिकांना अभिवादन केले. त्यानंतर ते मंचाच्या मागील दारातून बाहेर निघाले. सभोवताल सुरक्षारक्षकांचा कवच होता. परतीसाठी ते सरळ विश्रामभवनाकडे निघाले. पाठीमागे स्थानिक नेतेही होते. काही दूर जात नाही तोच राहुल गांधी मागे परतले आणि थेट गर्दीत घुसले. अचानक झालेल्या घडामोडीने सुरक्षारक्षकांपुढे पेच निर्माण झाला. यावेळी त्यांनी महिला-पुरुषांना अभिवादन करून, वयोवृद्धांचा आशीर्वाद घेतला. या गर्दीत त्यांनी एका छोट्याशा मुलाचे कौतुकही केले. तीन-चार मिनिटांच्या या गोड आणि विलक्षण क्षणात अनेकजण भारावून गेले होते. त्यानंतर रस्त्याने अभिवादन करीत असतानाच त्यांनी अचानक गाडीखाली उतरून पुन्हा गर्दीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.