जुन्नर,/आनंद कांबळे
: शेतकरी प्रश्नांवर दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी देशव्यापी होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि स्थानिक प्रश्न घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या जुन्नर तालुका समितीच्या वतीने नायब तहसीलदार मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, सबंध देशभरात शेतीचे भयानक संकट निर्माण झालेले आहे. शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांची गळचेपी ही आपण रोज अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेकडो शेतकरी संघटना एकत्रि त येत, संयुक्त किसान मोर्चा हे देशपातळीवरील एक मजबूत शेतकरी संघटन निर्माण झालेले आहे. या देशपातळीवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्माण झालेल्या, संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा देशव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे.
संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात वरील देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील ओला दुष्काळ, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, वनाधिकार, अपूर्ण कर्जमुक्ती यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आज राज्यभर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, निदर्शने, ट्रॅक्टर मार्च आयोजित करण्यात आले होते, असेही जोशी म्हणाले.
निवेदनाद्वारे जुन्नर तालुक्यात मनरेगा अंतर्गत गाई गोठे शेतकऱ्यांनी बांधले आहेत त्याची थक्कीत बिले अदा करावीत, मनरेगा कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, गोद्रे उतळे वाडी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी किसान सभेच्या अध्यक्षा माधुरी कोरडे, उपाध्यक्ष मुकूंद घोडे, कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबाळे, खजिनदार नारायण वायाळ, दादाभाऊ साबळे, दीपक लाडके, प्रियांका उतळे, मंगल रढे, किसन घोडे, रुपाली रेंगडे, सोनाली सुरकुले, दीपाली उतळे, सुनीता आढारी, लता लोखंडे, कमल उतळे, गंगुबाई उतळे ,सुनीता उतळे आदींसह उपस्थित होते.