मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रपुरात सोन्याचा साठा सापडल्याची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिनझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती पुढे आली आहे.
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठावर असलेल्या गोंडपिपरी ते चिमूर तहसीलपर्यंत सुमारे २०० किलोमीटरच्या परिसरात हा तांब्या-सोन्याचा साठा पसरलेला आहे. नुकत्याच सापडलेल्या सोन्याच्या साठ्याचा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये अभ्यास करण्यात आला. त्याचा अहवाल केंद्रीय खाण मंत्रालयाला नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, मध्य क्षेत्र, नागपूर यांनी सादर केला होता. हा अहवाल आता सार्वजनिक करण्यात आला आहे. दोन भूवैज्ञानिकांनी हा अभ्यास केला आहे. ज्यात बल्लारपूरची बामणी आणि सिंदेवाहीची मिनझरी यांची तपासणी केली. त्यात तांब्याचा मोठा साठा मिसळलेला आहे, असे सांगण्यात येत आहे.
बामणीमधील ०.४ चौरस किमी आणि मिनझरी ब्लॉकमधील १.८५ चौरस किमी क्षेत्राचे मूल्यांकन केले. यात सोन्याचे प्रमाण प्राथमिक अंदाज असल्याचे चंद्रपूरचे जिल्हा गौण खनिज अधिकारी सुरेश नैताम यांनी सांगितले.