चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा (copper mines) तालुक्याच्या दुपारपेठ आणि ठाणेवासना येथे 7.2 मिलियन टन इतके मोठे तांब्याचे साठे असून, त्या ठिकाणी वेदांता कंपनी दोन खाणी सुरू करण्याच्या तयारीत आहे. 1 फेब्रुवारी 2019 मध्ये राज्य शासनाने वेदांताला आमंत्रित केले होते. ठाणेवासना येथे 768.72 हेक्टर जागेवर, तर दुपारपेठ येथे 816.29 हेक्टर जागेवर या खाणी प्रस्तावित असून, दोन्ही खाणी मिळून 7.2 मिलियन टन तांब्याचे साठे काढले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2019 मध्ये प्रक्रिया सुरू करून वेदांता कंपनीला आमंत्रित केले होते, अशी माहिती भूगर्भ शास्त्राचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे (suresh chopane) यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील ठाणेवासना, गोंडपिपरी तालुक्यातील दुबारपेठ, चिमूर तालुक्यातील लावरी आणि अडेगाव-मोटेगाव येथे तांब्याच्या खनिजाचे मोठे साठे आढळून आले आहेत. ‘जिओलॉजी अॅण्ड मायनिंग’ आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांच्या मदतीने ठाणेवासना आणि दुपारपेठ येथील तांब्याच्या साठ्यांचा प्राथमिक शोध पूर्ण झाला आहे. लावरी आणि अडेगाव-मोटेगाव ब्लॉक्सचा शोध सुरू आहे. ठाणेवासना आणि दुपारपेठ येथील तांबे उत्खननाच्या संभाव्यतेची माहिती देणारा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार करून सरकारकडे पाठविण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या अहवालाच्या आधारे बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील प्रमुख एका खासगी कंपनीने दोन्ही ब्लॉक खाणकामासाठी घेण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करून हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.