जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर पोलिस ठाण्यामध्ये भा.द.वि कलम 376 , 417 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करतो यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या वतीने वकिलांनी 1 लाखांची लाचेची मागणी करीत लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल फिर्यादीनंतर या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे च्या वतीने शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्नर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमोल साहेबराव पाटील आणि केतन अशोक पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडवळ हे जुन्नर वकील बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. पंकज डोके रा ओतूर यांनी फिर्याद नोंद केली आहे. 2021 मध्ये या शेतकऱ्यावर भा.द.वि. कलम 376 , 417 प्रमाणे जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून ब फायनल मंजुरी साठी दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा काही त्रुटींवर परत पोलिस ठाण्यात आला होता. तपास अधिकारी पाटील यांनी 164 प्रमाणे जबाब घेतला असून यामध्ये वाढीव कलमांचा समावेश होऊ शकतो. तसे न होण्यासाठी 1 लाख रुपये द्या. अशी वारंवार मागणी करीत होते. त्यांच्या वतीने वकील पडवळ यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली होती. लाचेची रक्कम देण्याची तयारी डोके यांची नसल्याने याबाबत ची तक्रार त्यांनी पुणे कार्यालयात नोंदवली. 1 लाख देण्याची तयारी न करता तडजोडीने 50 हजार रुपये देण्याची तयारी ठेवून त्यामधील 25 हजार आत्ता लगेच तर 25 हजार पुढील महिन्यात देण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. लाच लुचपत विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने जुन्नर मध्ये येऊन शनिवार दि 1 रोजी सापळा रचला. अमोल पाटील यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारली नाही. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मदत करतो. यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या वतीने वकील केतन पडवळ यांनी 1 लाख रुपयांची लाच मागणी करून लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. म्हणून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील हे पाच सहा महिन्यांपूर्वीच जुन्नर पोलिस ठाण्यात रुजू झालेले होते. तर जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून पडवळ हे कार्यरत आहेत. या दोघांवर दाखल झालेल्या या प्रकरणामुळे जुन्नर मध्ये खळबळ उडाली आहे.