मुंबई : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरडे झिझवावे लागते. विविध ठिकाणी विशेष करून विदर्भात मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटना अत्यंत निंदनीय असून रोखण्यासाठी ठोस आणि किचकट नसणारे परिपत्रक काढावे, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कारेमोरे यांनी केली. येत्या काळात लवकरच यावर गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन शिंदे यांनी कारेमोरे यांना दिले.
बदल्यातील भ्रष्टाचार थांबवा
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना पारदर्शक आणि समुपदेशन पद्धत अवलंबवावी, अशी मागणी कारेमोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. तसेच काही अधिकाऱ्यांची गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात बदली झाल्यावरही तेथे जाण्यास अधिकारी तयार नसतात. याकडेही मुख्यमंत्री शिंदे यांचे कारेमोरे यांनी लक्ष वेधले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, गृह, वन आणि अन्य विभागातील अधिकारी एकाच ठिकाणी बरीच वर्ष असतात. यावर निर्णय घेऊन बदलीतील भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी कारेमोरे यांनी केली. मुख्यमंत्री यांनी यावर लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.