धानोरा गावाजवळील वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा - आ. किशोर जोरगेवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत केली मागणी
Chandrapur Local News |
चंद्रपूर | जिल्ह्यातील धानोरा गावाजवळील वर्धा नदीवर पुल बांधण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहतुक व राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपुर येथे ना. गडकरी यांची भेट घेत सदर मागणी केली आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या धानोरा या गावातील वर्धा नदीवर कमी उंचीचा पुल आहे. सदर पुल गडचांदुर, कोरपना, यासारख्या सिमेंट उद्योग असलेल्या महत्वपुर्ण गांवाना जोडतो. मात्र चंद्रपूरात आलेल्या पुरात सदर पुल हा २६५ तास पाण्याखाली गेला होता. त्यामुळे हा पुल क्षतिग्र्रस्त झाला आहे. या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरु शकते. त्यामुळे नागरिकांना वाहतुक सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टिने येथे उंच पुल तयार करण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
सदर पुल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी पुलावरून वाहते. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटतो या सर्व बाबींचा गार्भियाने विचार करुन येथे उंच पुल बांधण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी नागपुर येथे वाहतुक व राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असुन सदर पुलाच्या बांधकामासाठी ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. यावेळी सदर मागणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. या प्रसंगी मतदार संघातील इतर महत्वाच्या विषयांवरही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे.