राज्यपालांच्या उपस्थितीत आज घडणार इतिहास: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चा प्रयत्न
पुणे, दि.१४- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या युवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रध्वजासोबत एक लाख पन्नास हजार फोटोंचा संग्रह झाला असून राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आज (१५ ऑगस्ट) नवा इतिहास घडविणार आहे.
याबाबत माहिती देताना हर घर तिरंगा आणि युवा संकल्प अभियानाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ' हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दीड लाख फोटो राष्ट्रध्वजासोबत काढत जागतिक गिनीज बुक मध्ये विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत एक लाख पन्नास हजार फोटोंचा संग्रह करण्यात आला आहे. याला महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून अशा प्रकारचा रेकॉर्ड करू पाहणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, आयोजन समिती अध्यक्ष राजेश पांडे, सदस्य डॉ.संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर तसेच सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि सर्व अधिकार मंडळाचे सदस्य तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेस्थळावर केले जाणार आहे.
हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत आयोजित युवा संकल्प अभियानाला महाराष्ट्रातील नागरिकांनी इतक्या कमी कालावधीत दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल मी आभारी आहे. विद्यापीठाने याआधीही अशा प्रकारचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले असून हा आमचा दुसरा प्रयत्न आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या या अभियानाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत याचा मला अभिमान आहे .
- राजेश पांडे, आयोजन समिती अध्यक्ष
हर घर तिरंगा व युवा संकल्प अभियान