चंद्रपूर शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात स्वच्छता करा
मागील दोन वर्षात कोरोना विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता देखील रोगप्रतिकार क्षमता कमी झाली आहे. आता शाळा व महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र व प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. परंतु सद्य तरी या परिसरात स्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात स्वच्छता करून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपा अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आज 18 जून रोजी पत्राद्वारे चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना केली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत शेकडो शाळा व महाविद्यालय आहेत. परंतु सभोवतालच्या परिसरात अद्यापही अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो. अनेक शाळेच्या बाजूला असलेले नाली व वयक्तीक भूखंडावर देखील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येत्या काळात पावसाळ्यामुळे उद्भवणारे आजार व शाळेभोवताल असणारी अस्वच्छता यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही समस्या भविष्यात उद्भवण्यापूर्वीच चंद्रपूर शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात स्वच्छता करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना केली आहे.