'उमेद'तर्फे लघुपट, माहितीपट, चित्रफित निर्मिती स्पर्धा
स्पर्धा सर्वांसाठी खुली, भरघोस बक्षीसे
चंद्रपूर : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता गटातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धा १ ते ३० जूनदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत व्यावसायिक आणि हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते, युटयूब vloger यांना सहभागी होता येणार आहे. राज्यस्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ३ लाख, द्वितीय २ लाख व तिसरे पारितोषिक १ लाखाचे देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने जिल्हयात दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या नावाने अमलबजावणी केली जाते. महाराष्ट्रात २०११ पासून या अभियानाची अमलबजावणी केली जात असून, स्वयसहायता समुहाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नवाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अनेक कुटूंबांच्या जीवनामानात फरक पडला आहे. या यशोगाथांना दृकश्राव्य माध्यमातून चित्रीत करण्यासाठी राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धा १ ते ३० जूनदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे परिक्षण राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष करणार आहे. जिल्हास्तरावर सहभागी एकूण स्पर्धकांपैकी पहिल्या ५ स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र तसेच राज्यस्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ३ लाख, द्वितीय २ लाख व तिसरे पारितोषिक १ लाखाचे आहे.
उत्तेजनार्थ पुरस्कार ५० हजार रुपयांचे आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी इच्छूकांनी जिल्हा व्यवस्थापक (ज्ञान व्यवस्थापन व विपणन) श्री. गजानन ताजने (9881156188 , dmmuchandrapur@gmail.com) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे, HD दर्जा, अप्रकाशित असावे. लघूपट निर्मितीत व्यावसायिक , हौशी, स्वयंसहायता समुह, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्यासह सर्वसामान्य नागरिक यांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
या स्पर्धेत मोठया प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अभियान संचालक मीताली शेठी, जिल्हा अभियान सहसंचालक वर्षा गौरकार यांनी केले आहे.