ज्यांच्या नावांनी कुठेच घरे नाहीत व ज्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे अशांना ही संधी द्यावी. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी म्हाडाची घरे धूळ खात पडलेली आहेत. त्या सदनाचे वाटप केल्यास सामान्य नगरसेवकांना त्याचा फार मोठा आधार मिळेल. तसेही नगरसेवकांना मिळणारे मानधन फार तुटपुंजे असते. बैठकीचे मानधनही फारच अल्प असते. तसेच त्यांना पेन्शन लागू नसल्यामुळे ह्या जनप्रतिनिधींना सतत आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य हे सुद्धा लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. त्यांना जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे छत्र उपलब्ध करून दिल्यास त्यांना फार मोठे मानसिक बळ मिळेल असा विश्वास दिलीप पनकुले यांनी व्यक्त केला.
काही नगरसेवक आजही परिवार चालवण्यासाठी अनेक हालअपेष्टांना तोंड देत आहेत. विशेषतः अनेक मराठी नगरसेवक आर्थिक परिस्थितीअभावी मागे पडत आहेत. पैशाच्या राजकारणामुळे व बाहुबली प्रवृत्तीमुळे अराजकता माजवणारे लोक राजकारणात पुढे येत असल्याचे निदर्शनास येत आहे, याबाबतही त्यांनी विशेष लक्ष वेधले. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित (दादा) पवार, प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील, जलसंपदा मंत्री, गृहमंत्री व संपर्कमंत्री मा. ना. दिलीप वळसे पाटील, मा. ना. जितेंद्र आव्हाड, तसेच आमचे जेष्ठ नेते व पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार व खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन या बाबतचे निवेदन सादर करण्यात येईल, असे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी या पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
Give houses to former councilors and Zilla Parishad members too: Dilip Pankule |