मागील दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले असून, कित्येक पालकांचे रोजगार हरवले. कित्येक पालकांचा मृत्यू झाला. अशा अत्यंत गरजू ३० पाल्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अर्थात बानाई, चंद्रपूरतर्फे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, वडगाव, चंद्रपूर येथे आयोजित समारंभात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
हैदराबाद येथील आर. आर. कन्स्ट्रक्शन कंपनी व बानाई, चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षीपासून गरज आधारित शिष्यवृत्ती (Need Based Scholarship) सुरू करण्यात आली असून, या वर्षी 30 विद्यार्थ्यांना ती वितरित करण्यात आली. कोणत्याही जाती अथवा धर्मावर आधारित निकष न ठेवता निवडीमध्ये सर्वसमावेशकता ठेवण्यात आली हे या शिष्यवृत्तीची विशेषता. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली हे या शिष्यवृत्तीचे दुसरे वैशिष्ट्य.
सदर कार्यक्रमाला जलसंधारण विभाग, चंद्रपुर चे कार्यकारी अभियंता एस बी काळे व चंद्रपुरातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता दिलीप वावरे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते तर अध्यक्षस्थानी बानाई चंद्रपूर चे अध्यक्ष प्रा. नीरज नगराळे होते.
प्रास्ताविक बानाई चे सचिव इंजि. किशोर सवाने यांनी केले. बानाई ची भूमिका व सामाजिक कार्य याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
समाजाचे ऋण फेडण्यात बानाई चा मोलाचा वाटा आहे, असे मत प्रमुख अतिथी एस. बी. काळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. यशासाठी मूलभूत ज्ञान आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले. कार्यक्रमाचे दुसरे अतिथी मान. दिलीप वावरे यांनी देशात नोकरीच्या संधी कमी होत असताना युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे असे आवाहन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.
बानाई ची शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये समाजाचे ऋण फेडण्याची भावना जागृत झाली पाहिजे व त्यांनी आयुष्यात अशाच गरजू लोकांना मदत केली पाहिजे असे विचार प्रा. नीरज नगराळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रविण पडोळे यांनी तर आभार बानाई चे कोषाध्यक्ष इंजि. चेतन उंदीरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बानाई चे इंजि. यशवंत कवाडे, इंजि. संतोष सोनेकर, इंजि. संजय ढेपे, इंजि. प्रकाश करमरकर, इंजि. प्रितेश जीवने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Chandrapur #corona Need Based #Scholarship