Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०४, २०२२

डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरचे लोकार्पण

 डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरचे लोकार्पण


नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य-जलसंपदामंत्री जयंत पाटील



पुणे, दि. ४: नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य मानून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यात येत आहे. कै. अरविंद बारटक्के रुग्णालयात सोनाग्राफी तसेच एक्स रे यंत्रणा उपलब्ध झाल्याने आजाराचे निदान वेळीच शक्य होऊन तत्काळ उपचार होऊ शकतील. डायलिसिस सेवाही उपलब्ध असल्याने वारजे परिसरातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होऊन रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले .


पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के दवाखाना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स रे सेंटरचे लोकार्पण जलसंपदामंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे (दूरदृष्य प्रणालीद्वारे),  महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ  आदी उपस्थित होते.


श्री. पाटील म्हणाले, वारजे परिसरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी या भागातील नगरसेवकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. कै. अरविंद बारटक्के दवाखाना येथे डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स रे सेंटरच्या माध्यमातून अत्यंत कमी दरात या सेवा मिळणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा देणे ही मोठी सेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना या सेवा अत्यंत उपयोगी ठरतील असे त्यांनी सांगितले.


राज्यात आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाने भर दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षाही गतीने वाढते आहे. त्यामुळे यापुढील काळात अधीक दक्षता घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुणीही गाफील न राहता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

खा. सुळे म्हणाल्या, आरोग्यासह सर्व सोईसुविधा वारजे परिसरात उपलब्ध आहेत. पुण्यातील चांगला परिसर अशी नवी ओळख वारजे परिसराने निर्माण केली आहे. कोरोना कालावधीतही चांगले काम नगरसेवकांनी केले आहे. सामूहीक प्रयत्नातून कोरोनावर नक्कीच मात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारजे परिसरात डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स रे सेंटरच्या माध्यमातून आरोग्याच्या चांगल्या सेवा वारजेकरांना मिळतील. नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.पाटील यांनी यावेळी डायलिसिस केंद्राची पाहणी केली. तसेच येथील तज्ज्ञांशी संवाद साधून उपचार सुविधांची माहिती घेतली.

कार्यक्रमाला नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे यांच्यासह प्रशांत जगताप, प्रदिप धुमाळ उपस्थित होते.


#Dedication #Dialysis #Sonography #X-rayCenter


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.