Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी २८, २०२२

श्रीचक्रधर स्वामी अष्टपर्वानिमित्त ३०० देवस्थानांच्या विकासासाठी रस्ता तयार व्हावा





मुख्यमंत्र्यांकडे हरिहर पांडे यांची मागणी

नागपूर : महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामींच्या अवतरण अष्टशताब्दी वर्षानिमित्त ३०० देवस्थानांच्या विकासासाठी रस्ता तयार करावा, अशी मागणी नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे. गोदावरीच्या प्रवरासंगम जवळील कायगाव येथून धोत्रे (समृद्धी महामार्गापर्यंत) ६० किमीच्या रस्त्यामुळे औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ३०० देवस्थानांना गतवैभव प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे इतरही लाभ या रस्त्यामुळे होऊन परिसराच्या विकासात साह्य ठरू शकते.
'गोदावरी' नदीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. भगवान श्रीकृष्ण महाराजांचे अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात महानुभाव पंथ स्थापन केला. त्यांनी कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राची निवड करीत आपले तत्वज्ञान मराठीत निरूपण केले. यंदा स्वामींचे अवतरण अष्टशताब्दी वर्ष आहे. स्वामींचे श्रीक्षेत्र डोमेग्राम (कमालपूर) येथे बरेच दिवस वास्तव्य होते, येथुनच महानुभाव पंथाची पायाभरणी झाली. पंथियांच्या १६५० तीर्थस्थानांपैकी ३०० देवस्थाने या परिसरात आहेत. स्वामींच्या पदस्पर्शाने धोत्रे, हिंगोणी, पुरणगांव, पुणतांबा, सावखेड गंगा, नायगांव, नाऊर, वाजरगांव (सराला बेट), भालगांव, चांदेगांव, नागमठाण, हमरापूर, बाजाठाण, डोमेग्राम (कमालपूर), देवगांव, घोगरगांव, बेलपिंपळगांव, सुरेगाव, नेवरगांव, कानडगांव, ममदापूर, बागडी, जामगांव ही गावे पवित्र झालेली आहेत. दरवर्षी लाखो मंडळी या परिसरात दर्शनासाठी येतात; परंतु अनेकांची इच्छा असूनही रस्त्यांमुळे वंचित राहतात.
धोत्रे येथून समृध्दी महामार्गापासून हिंगोणी- पुरणगाव- सावखेड (गंगा)- सराला बेट- भालगांव- डाकपिंपळगांव- चांदेगांव- नागमठाण- हमरापूर- बाजाठाण- देवगांव- चेंडूफळ- हैबतपूर- नेवरगांव- कानडगांव- ममदापूर- बागडी- जामगांव- कायगांव (प्रवरासंगम) राष्ट्रीय महामार्गापर्यंत असा रस्ता तयार झाल्यास नगर जिल्ह्यातील कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या तालुक्यातील शेकडो गावांना थेट फायदा होईल. डोमेग्राम, सराला बेट आणि इतर धार्मिक ठिकाणांना पुन्हा वैभव प्राप्त होण्यास सहाय्य ठरेल.
श्री चक्रधर स्वामींचे शिष्य पंडित म्हाइंभटांचे जन्म गांव 'सराला'ची मराठी साहित्यात वेगळी नोंद आहे. गोदावरीच्या मधोमध असलेल्या 'सराला बेटा'वर औषधीयुक्त वनस्पती, फळबागा, गोशाळा असून नदीच्या दुतर्फा पर्यावणपूरक झाडे लावण्यात आली आहेत. बेटाच्या चारही बाजूने पुलांची बांधणी करून हेलिपॅड, व्यापारी संकुल, बेटासमोरच्या मैदानावर भव्य भक्तनिवास तसेच गोशाळा उभारण्यात येत आहे. अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेटाकडे यायला धड रस्ता नाही, हे मोठे दुर्दैव म्हणाले लागेल. दर एकादशीला या तिन्ही जिल्ह्यांतील १० ते १५ हजार वैष्णवांचा मेळा बेटावर जमतो. खड्यांत हरवलेल्या रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास करीत भाविक ये-जा करतात.
गोदेकाठच्या परिसरात मुबलक पाणी असूनही हा भाग विकासापासून दूर आहे. येथे दूध, भाजीपाला, फुले, फळे या लवचिक आणि नाशिवंत वस्तुंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुलभ आणि जलद वाहतूक व्यवस्था असल्यास या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होईल. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे आराखडा तयार करावा, असे हरिहर पांडे यांनी अष्टशताब्दीच्या औचित्याने परिसराचा विकास व्हावा, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात लिहीले आहे.

*या रस्त्यामुळे होणारे विविध फायदे*
१) धोत्रे ते कायगांव रस्त्यामुळे ३०० देवस्थाने जोडले जातील, यामुळे स्थानांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास सहाय्य.
२) अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ६ तालुक्यातील शेकडो गावांना थेट फायदा.
३) ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांना गतवैभव प्राप्त होईल.
४) 'सराला बेटा'चा विकास होऊन इतरत्र पर्यटनाला वाव.
५) समृद्धी महामार्गाला उत्तम कनेक्टीव्हीटी.
६) उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येईल, त्यामुळे शेतीला प्रोत्साहन.
७) नविन उद्योग येतील, रोजगार उपलब्ध होईल.
८) सामाजिक जीवनमान उंचावेल.


आपला
हरिहर पांडे
सामाजिक कार्यकर्ता, नागपूर
मो. ९६२३८०२०२०
Email: harry_pande@rediffmail.com
२५ जानेवारी २०२२

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.