कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून आवर्तन
पुणे दि.4: कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा, घोड शाखा कालवा व पिंपळगाव जोगे कालव्यात तर मिना शाखा कालव्यात २० डिसेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सिंचनभवन येथे झालेल्या बैठकीला आमदार अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, बाळासाहेब आजबे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.
कुकडी प्रकल्पामध्ये ३ डिसेंबर २०२१ रोजी २३.८९ टीएमसी (८०.५१ टक्के) पाणी उपलब्ध आहे. या पाण्यातून बाष्पीभवन, पिण्याचे पाणी, आरक्षण, विभागणी साठा, इत्यादीसाठी लागणारे पाणी वजा करता रब्बी हंगाम नियोजनासाठी १५.२० टीएमसी पाणी नियोजनासाठी उपलब्ध आहे.
प्रकल्पातील उपलब्ध पाण्यातून प्रकल्पातील सर्व कालव्याचे एक आवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कालवानिहाय रब्बी आवर्तन सुरू करण्याच्या तारखाही ठरविण्यात आल्या. कुकडी डावा कालवा १ जानेवारी २०२२, डिंभे उजवा कालवा, घोड शाखा कालवा, पिंपळगाव जोगे डावा कालवा २५ डिसेंबर २०२१ व मिना शाखा कालव्यातून २० डिसेंबर २०२१ रोजी आवर्तन सुरू करण्यात येईल. याबरोबरच डिंभे डावा कालवा, मिना पुरक कालवा हे कालवे आणि कुकडी, मिना व घोड नदीवरील कोल्हापूरी पद्धतीचे बंधाऱ्याचे आवर्तन आवश्यकतेनुसार सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला.
कुकडी प्रकल्पातील कालव्यांची "माझा कालवा माझी जबाबदारी" उपक्रमांतर्गत स्वच्छता केल्याने कालव्यांची वहनक्षमता वाढली आहे. अशा परिस्थितीत आवर्तनादरम्यान पुरेशा दाबाने पाणी मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी या पाण्याचा उपयोग काटकसरीने व कार्यक्षमतेने करावा, असे आवाहन जलसंपदामंत्री श्री. पाटील यांनी केले.
कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीस कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनश्याम शेलार, देवदत्त निकम, अशोक घोडके,सुदाम पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे, उपायुक्त नंदीनी आवडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे आदी उपस्थित होते.