संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.१ नोव्हेंबर:-
अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह हे मोठे धरण असून, सदर धरणांमध्ये पर्यटकांसाठी बोटिंग व्यवसाय सुरू केल्यास पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल.त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे अटी व शर्तीच्या अधीन राहून, स्थानिक स्वयंसेवी संस्थांना इटियाडोह तलावामध्ये बोटिंग व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नवाब मलिक यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान,नवेगाव बांध जलाशय, तिबेटियन वसाहत, प्रतापगड शिव मंदिर तसेच कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. पर्यटक पर्यटनाला आले असता, त्यांना जर गोठणगाव तलावामध्ये ठराविक परिसरात विविध प्रकारच्या बोटिंगचा आनंद लुटता आला, तर तलावावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत भर पडेल.स्थानिक इतर व्यवसायांना त्याचा फायदा होऊन,परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल. त्याकरिता नियमाच्या अधीन राहून स्थानिक स्वयंसेवी संस्थांना तलावांमध्ये बोटिंग व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य किशोर तरोणे यांनी केली. सदर निवेदनाची प्रत खासदार प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनाही देण्यात आली आहे .