पक्षविस्ताराच्या अनुषंगाने विदर्भात कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन
मुंबई,५ ऑगस्ट
तळागाळातील, वंचित, शोषित दलितांना प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ बहुजन समाज पार्टीच करू शकते. अशात राज्यभरात पक्षविस्ताराच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने 'संवाद यात्रा' सुरू करणार आहे. उद्या, ७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पक्षबांधणीचा आढावा ते घेतील. मा.सुश्री बहन मायावती जी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक, तरूण नेतृत्व आकाश आनंद यांच्या नेतृत्वात मा.रामजी गौतम साहब, मा.वीरसिंह जी साहेब यांच्या सूचनेनूसार पक्षात ५०% युवकांची भागीदारी निश्चित करीत पक्षविस्ताराच्या अनुषंगाने संवाद यात्रेतून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती, अँड.ताजने यांनी दिली.
अमरावती मधून संवाद यात्रेची सुरूवात होणार असून, ८ ऑगस्ट वर्धा, ९ ऑगस्ट चंद्रपूर, १० ऑगस्ट गडचिरोली, ११ ऑगस्ट गोंदिया, १२ ऑगस्ट भंडारा, १३ आणि १४ ऑगस्टला संवाद यात्रा नागपूरला पोहचेल. १५ ऑगस्टला अकोला १६ ऑगस्टला बुलढाणा तसेच १७ ऑगस्टला औरंगाबाद येथे संवाद यात्रा पोहचणार आहे. यावेळी कार्यकर्ता मेळावे तसेच पक्षविस्तारांच्या अनुषंगाने पक्षाचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बैठकी घेणार आहे.
पक्ष बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या सूचना देखील ते ऐकून घेतील. समाजकारण आणि राजकारण यात समन्वय साधून समाजाच्या उत्थानासाठी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज आहे. कार्यकर्ता मेळाव्यांतून 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' चे पार्टीचे उद्देश साध्य करण्याच्या अनुषंगाने योजना आखण्यात येतील, असे अँड.ताजने म्हणाले.
........................