नागपूर 3 ऑगस्ट 2021
नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये दहावीनंतर वस्त्रनिर्मिती पदविका अभ्यासक्रम उपलब्ध असून या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अमरावतीच्या टेक्सटाईल पार्क मधील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये या पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी काम करत असून त्यांचे चांगले अर्थार्जन होत असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे आज पत्रकार परिषदेत दिली . याप्रसंगी वस्त्रनिर्मिती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सी.पी. कापसे, विणकर सेवा केंद्राचे सहायक संचालक एम. पवनीकर, पीआयबी- पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक शशीन राय उपस्थित होते.
हा अभ्यासक्रम 1982 पासून नागपूरच्या सदर स्थित शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चालवल्या जात असून गारमेंट टेक्नॉलॉजी , टेक्स्टाईल डिझायनिंगच्या अत्याधुनिक पद्धती यात शिकवल्या जातात . या अभ्यासक्रमाच्या आधारे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात अशी माहिती डॉ. कापसे यांनी दिली . एम. पवनीकर यांनी हातमाग क्षेत्रातील केंद्र शासन तसेच विणकर सेवा केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी माहिती दिली . बूटीबोरी तसेच अमरावती एमआयडीसी येथे नामांकित टेक्सटाइल उद्योग येत असून त्यामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यासाठी ही पदविका अभ्यासक्रम सहाय्यभूत ठरेल असेही डॉ. कापसे यांनी यावेळी सांगितले .