जळगांव - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा खान्देशासोबत ८० ते ९० च्या दशकात स्नेह मोठ्या प्रमाणात जुळून आला. भाजपच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका आणि योगदान असलेले कणखर नेते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी होते.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये १५ ऑगस्ट १९८५ रोजी ‘नगर वाचन मंदिरा’चा शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी यावेळी शहरातील बोथरा मंगल कार्यालय येथे भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.
वाजपेयी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत हितगुज करीत विविध विषयांवर चर्चा केली. शहरातील अनेक मान्यवरांनी अटलजींचे विशेष स्वागत केले. त्यामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना स्वरचित सम्मानपत्र देण्याचे मला भाग्य लाभले. ‘सातपुडा की चट्टानोमें देशभक्तिकी झिर आयी हैं’ असे त्या सम्मानपत्राचे शीर्षक होते. त्या सन्मानाचा अटलजींनी स्वीकार केला. हे सन्मानपत्र वाचल्या नंतर अटलजी भारावून गेले. आणि ही दुर्मिळ आठवण माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहिली. अटलजी यांच्याशी माझा जेव्हा पहिला संवाद झाला तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला होता. एके काळी अटलजी ग्वाल्हेरला माझे वडील द्वारकादास पालिवाल यांच्यासह दीड महिना जेलमध्ये होते. त्यामुळे त्या दोघांचा चांगला परिचय होता. मग मी त्यांना माझ्या वडिलांचा परिचय दिला. तेव्हा अटलजी म्हणाले, आप मास्टर साहाब के लडके हो? क्या करते हो? मी म्हंटल, पत्रकारिता करता हु. यावर अटलजी म्हणाले, बोहोत बढीया. आप बोहोत आगे जाओगे और बडे बनोगे. त्यांच्या आशीर्वादानी मी देखील भारावून गेलो.
अटलजी वक्तशीरपणाच्या बाबतीतही फार पक्के होते. नगर परिषदेच्या एका कार्यक्रमाला त्यांना जायचे असल्याने त्यांनी हा कार्यक्रम मध्येच सोडला आणि पुढील कार्यक्रमासाठी जाण्यास निघाले. माझी त्यांच्याशी दीड ते दोन मिनिटे चर्चा झाली. महसूल मंत्री उत्तमराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. १९५७ साली उत्तरप्रदेश येथील बलरामपूर येथून अटलजी आणि महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून उत्तमराव हे खासदार म्हणून एकाचवेळी निवडून आले होते. धुळे मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची धुरा माझ्या वडिलांनी कार्यालय प्रमुख म्हणून सांभाळली होती. उत्तमराव यांच्या माध्यमातून वडिलांची आणि अटलजींची इतकी जवळीक निर्माण झाली की ते जेव्हा पण वडिलांना भेटायचे तेव्हा ते थेट नावानेच हाक मारायचे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अटलजी यांच्याशी झालेली ही दुर्मिळ भेट कायमस्वरूपी स्मरणात राहील. अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली !!
ता. क. :- माननीय अटलजी यांच्यासोबतही माझी आयुष्यातील पहिवाहिली भेट ही मुंबईच्या बांद्रा येथे १९८० साली झाली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पहिले अधिवेशन होते. त्यावेळी मी दैनिक बातमीदारच्या माध्यमातून अटलजी यांची पहिली मुलाखत घेतली होती. हा क्षण खरच अविस्मरणीय अनुभव होता. ही भेट मला तत्कालीन आमदार धरमचंद चोरडिया यांनी मिळवून दिली.