Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट १५, २०२१

मार्शलशाही पुढे, लोकशाही मागे...!




आज 15आँगस्ट-2021۔ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. त्यासोबत जुडले आहे. तुमच्या,आमच्या कुटूंबाचे. समाजाचे. अन् देशाचे भविष्य. कालपर्यंत देशाने बरेच काही उभारले. ते आता विक्रीस निघाले. काही विकले. काही खासगी लोकांना सोपविले. आता विमानतळ, बस स्थानक तुमचे नाहीत. रेल्वे स्टेशन, रेल्वे, मुख्य रस्ते, बंदर, शाळा, दवाखाने तुमचे नाहीत. ते सरकारी नाहीत. काही खासगी मालकीचे झाले. उरलेले हळूहळू होतील. अदाणी, अंबानी किंवा अन्य देशी, विदेशी कुंबेरांचे राहतील. तिथे मार्शल व बाउंन्सर असतील. कोणाला आंत घ्यावयाचे .कोणाला नाही. हे मालक किंवा कंपनीचा माणूस ठरवील. फाटक्या माणसाला प्रवेश नसेल. आता सारखे कॉलर झटकत जाता येणार नाही. प्रवेशासाठी निर्बध व मोबदला राहील. पुढचा मोबदला वेगळा असेल. रस्त्यांवर जसा गडकरी टॅक्स मोजावा लागतो. तो चुकविल्या शिवाय सुटका नाही. पथकर न देता जाऊन दाखवा.कधी अनुभव घेवून बघा. टोलनाके वसुली नाके बनले. एक नाही तर शंभर किलोमीटर अंतरात तीन-चार असतील. एकीकडे ही वसुली. दुसरीकडे गाडी इंधन पेटले. तीन-चार पटीने वाढले. मध्यमवर्गीय माणूस गाडी पोसू शकत नाही. सार्वजनिक वाहनाने जावे. तर किलोमीटर मागे चार-पाच रुपये. शंभर किलोमीटरमागे 500 रुपये कुठून मोजणार. गरीब व गावातील माणसांचा प्रचंड कोंडमारा. गावातील लोकांना विचारा. हेच मत निघेल. 80 कोटी लोकांना पाच किलो मोफत धान्य मिळते. ते जगण्याचा आधार. बाकी खर्चाचे काय ..! हे सर्व चिंताजनक आहे.

कंपनी राज वाढतेय्.....

सार्वजनिक उपक्रम, इमारती, मालमत्ता खासगी होत आहेत. पुन्हा कंपनी राज येत आहे. चोर मार्गे...! तुम्ही निवडून पाठविलेला प्रतिनिधी मौन आहे. त्याचे वेतन-भत्ते वाढलेत. अनेक पिढ्यांची सोय झाली. छोट्या मोठ्या स्थानक, स्टेशनचा तो सुध्दा मालक बनेल. उत्पन्नाचे त्याचे मीटर चालू असेल. गरीब,मध्यमवर्गीयांचे कसे. बसस्थानक, रेल्वेस्टेशनवरील वसुलीला विरोध चालणार नाही. आवाज चढवून बोलता येणार नाही. कोणी केला. तर मार्शल येतील. उचलून बाहेर फेकतील. देशाच्या राज्यसभेत घडते. मार बसला. जिथे खासदारांचे चालले नाही. मग तुम्ही कोण लागले. तोफखान...! आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. या पुढचा काळ मार्शलशाहीचा असेल. लोकशाही नावाची दिसेल. त्या चटणी- भाकरी प्रमाणे. पाच किलो फुकट धान्याप्रमाणे. त्या भविष्याचा विचार करा. संकट संसदेत पोहचले. लवकरच  राष्ट्रवादाचा नारा देत. तुमच्या दारापर्यंत पोहचेल.


अन्  ती  पोस्ट ....

 मार्शलशाही वेगवान आहे.
समाज माध्यमांवर एक पोस्ट फिरत आहे. सत्तर वर्षात जे वडिलास जमले नाही. ते करून दाखविले. त्यांची  शेती विकली. नवी कोरी कार दारात आणली. या पोस्टप्रमाणे मोदी सरकारचा कारभार आहे. नफ्यात जे जे आहे. ते कवडीमोल भावात विकत आहे.  ही मार्शलशाही आहे. नागपूरसह राजधान्यांमधील विमानतळ विकल्या गेले. बघत राहा. त्या पुढचा नंबर कशाचा असेल. आंदोलन नव महिने चालते. हे कधी बघितले होते. किसान आंदोलनाचे आठ महिने पुरे झाले. नवव्या महिन्यात प्रवेशले. त्यांना राजधानीच्या सीमेवर मार्शलशाहीने रोखले. आता पोलिस ठाण्याचे भाव लागतात. हे क्राईमवाल्यांच्या बातम्यांचे विषय आहेत. भविष्यात ठाणे विकले जातील. त्या ठिकाणी मार्शल दिसले. तर नवल नाही. सरकार नवलाईचे आहे. काहीचे वय वाढले. अनेकांना चष्मे लागले. भावी पिढी डिजिटल असेल. त्यांच्या पुढे काय वाढले असेल. त्याचा अंदाज नाही. खासगीकरणाचा जमाना आहे. संसार, संस्कृती, समता, समानता. माणुसकी असेल काय..! ही चिंता आहे.


विक्रीची लाट आहे....!

 संसदेचे पावसाळी अधिवेशन संपविले. त्यात वीस विधेयक संमत झाले. एका खासदाराने सांगितले. विमा संशोधन विधेयक अडला असता.  सिलेक्ट कमेटीकडे पाठविण्याच्या  सूर होता. त्यात वायएसआर,बीजेडी खासदारांनी सूर मिसळला. मतदानास टाकणे. धोक्याचे वाटले. त्यासाठी गोंधळाचा बनाव  झाला .शंकेला वाव आहे. सफाईदार राजकारण आहे. असली, नकली ओळखणे कठिण आहे. ही मार्शलशाही आहे. ती रूप बदलते. कुठे कसे रूप बदलले. त्यासाठी गुजरात ते संसद अभ्यासावे लागेल. तसेच संमत  विधेयकांचे पोस्टमार्टम करावे लागेल. तेव्हाच सत्य कळेल. तोपर्यंत जय , जय चालेल. तीस-चाळीस टक्के लोक अशिक्षित. त्यांना इथले कसे कळेल. तेच मतदानात आघाडीवर. निवडून येण्यास 35 टक्के मतांची बेगमी पुरी. त्यांना ठोकशाही, मार्शलशाही, लोकशाही यातले काही ठाऊक नाही. त्यांना कोण जागवेल. हा दम कोणत्या पक्षात आहे. 65 टक्क्यात फाटाफुट आहे. हा पश्चिम बंगाल थोडीच आहे. एकजूट, मोट, परिवर्तन, बदल हे कागदी घोडे आहेत. घरापर्यंत पाणी आले. तरच कदाचित ते पोहतील. अन्यथा बाजार आहे. विक्रीची लाट आहे. विकणे अटळ आहे.  काय आणि कोण विकला जाईल. ते दिसत आहे.आणखी दिसेल. तो पर्यंत थोडा आराम आहे.
-भूपेंद्र गणवीर
...................BG......................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.