Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०९, २०२१

चंद्रपूर शहरात ५४२ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग


रेनवॉटर हार्वेस्टिंग लावा; मनपाकडून प्रोत्साहनपर अनुदान मिळवा

चंद्रपूर शहरात ५४२ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग; ३०४ जण अनुदानास पात्र

चंद्रपूर, ता. ९ : शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना २ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत ५४२ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था झाली असून, यातील ३०४ नागरिक अनुदानासाठी पात्र ठरलेत.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या २७ जून २०१६ च्या सर्वसाधारण सभेत रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने ठराव पारित करण्यात आला. नवीन बांधकामाला परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था प्रस्तावित नवीन बांधकाम करणे अनिवार्य  करण्यात आले. यासाठी इमारतीच्या छताच्या आकारानुसार व मजला निहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. छताचे क्षेत्र २ हजार चौरस फूटापर्यंत प्रथम माळा २० हजार रुपये, द्वितीय माळा २५ हजार रुपये, छताचे क्षेत्र २ हजार चौरस फूटापेक्षा अधिक असल्यास प्रथम माळा २५ हजार रुपये, द्वितीय माळा ३० हजार रुपये, सदनिकांचे बांधकाम चौथ्या मजल्यापर्यंत ३० हजार तर चौथ्या मजल्यापेक्षा  अधिक ५० हजार रुपये अनामत रक्कम आकारण्यात येत आहे.

शहरात अस्तित्वात असलेल्या सर्व मालमत्तधारकांनी त्यांच्या इमारतीस रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहनपार अनुदान तथा मालमत्ता करात सूट देण्यात येत आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या मालमत्ताधारकांना २ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्याचे काही अटीवर ठरविण्यात आले.  

मनपा हद्दीत ८७ हजार मालमत्ता आहेत. यातील अधिकाधिक इमारतींमधे ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व ५ इमारती, २९ शाळा, ६ सार्वजनिक आरोग्य केंद्रे, १२ सार्वजनिक शौचालये अशा एकूण ५२ इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय, नियोजन भवन कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, कृषी भवन इत्यादी इमारतींवर मनपातर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे.

शहरातील अधिकाधिक घरे, इमारतींमधे रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.