चंद्रपूर, ता. ११ : चंद्रपूर शहराची ओळख गोंडकालीन साम्राज्य, वाघ आणि वनसंपत्तीसाठी आहे. मात्र, औद्योगिक विकासानंतर प्रदूषित शहर अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे शहरातील पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी स्वतः विविध माध्यमातून पुढाकार घ्यावा, असे आवाहन ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश चोपणे आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी केले.
महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी 'संवाद' या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक ११ जून रोजी 'चंद्रपूर शहराचे पर्यावरण, आव्हाने आणि उपाययोजना' या विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश चोपणे आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी सहभाग घेतला.
यावेळी ते म्हणाले, चंद्रपूर शहरात पूर्वी तलावांची संख्या जास्त होती. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे शहर विस्तारले आणि लोकवस्ती उभी होऊन तलाव गिळंकृत झाले. सध्या रामाळा तलाव अस्तित्वात असून, त्याचे जतन झाले पाहिजे. इरई आणि झरपट नद्यांच्या काठावर नागरिकांनी अतिक्रमण थांबविल्यास भविष्यात जलवाहिन्या कायम राहतील. शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी इंधनाच्या वाहनांचा वापर कमी करून शक्य तिथे सायकलचा वापर झाला पाहिजे. यातून वैयक्तिक व्यायाम होईल आणि प्रदूषण थांबेल.
पुढे ते म्हणाले, सध्या पावसाचे दिवस आहेत, पावसाचे पाणी भूगर्भात जिरविण्यासाठी इमारतीवर रेनवॉटर हॉर्वेस्टिंग यंत्रणा जास्तीत जास्त नागरिकांनी उभारण्याची गरज आहे. मनपाच्या माध्यमातून वृक्षलागवड केली जाते. नागरिकांनी आपले कर्तव्य समजून वृक्षांचे संगोपन केले पाहिजे. तसेच शासनाचे पर्यावरण विषयक उपक्रम लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. डॉ. चोपणे आणि प्रा. डॉ. दुधपचारे यांनी व्यक्त केली.