Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे १६, २०२१

स्मशान घाट अपुरे पडतात.....






कोरोना संसर्ग वाढला. सत्तर वर्षाचा हिशेब कळला. अवघ्या सात वर्षात. हिशेब मागणारेही उघडे पडले. जुने रुग्णालयं कामात आली. तिथे बेड अपुरे पडले. त्या बेडसाठी रांगा . प्राणवायूसाठी रांगा . इंजेक्शन , औषधींसाठी रांगा. तरीअनेकांना मिळाले नाही. त्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्यांच्या प्रेतांची स्मशानात गर्दी. अत्यंसंस्कारासाठी स्मशान घाटात रांगा . तिथंही जागा मिळाली नाही. त्यांना नदीत सोडण्यात आलं. नदीनं स्वीकारले नाही. तिनं किनाऱ्यावर फेकलं. तेव्हा देश-विदेशातून आवाज उठले. मोदी-योगी सरकार खडबडून जागलं. तोंड लपवायला जागा नाही. तरी जोरात लपवालपवी . ते बिहारचे की उत्तरप्रदेशचे नवा वाद. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार. सत्तर वर्षात कधी दिसलं हे चित्र .या काळात विशिष्ट वर्गांचेच पोट वाढले. नोकऱ्या,उत्पन्नांची साधनं त्यांच्याच घरात. तेच विचारतात 70 वर्षात काय झालं. ज्यांचे पोट पाठीला भिडले.तो कामगार,शेतकरी,बहुजन, वंचित गप्प आहे. उच्चवर्णीय व्यवस्थेचा बळी. त्यानं विचारावं आम्हाला काय मिळालं. शेतकऱ्यांनी हिंमत केली. दिल्लीच्या दारात गेले.सहा महिन्यापासून बसले आहेत. सरकार त्यांना विचारत नाही. ही सरकारी कोणती कातडी असेल.

रुग्णवाहिकांची साठेबाजी बिहारात आढळली. एक नाही. चाळीस रुग्णवाहिका. झाकून दारात उभ्या. भाजपच्या माजी मंत्र्याचा प्रताप.  खासदार निधीचा असाही दुरूपयोग . रेती तस्करीसाठी त्यांचा वापर होता. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणारा पप्पू यादव यांना अटक होते. अन् भ्रष्टाचारी  रूडी मोकळा फिरतो. अडल्या, नडल्या  कोरोना रुग्णांना मदत करणे पप्पू यादव यांना नडते. यास म्हणावे, नितीश कुमार यांचे  सुशासन. हे बिहारातच नाही. दिल्लीतही घडले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. यांनी स्वत:  व आपल्या टिमचे जीव धोक्यात घातले. मागेल त्या रुग्णास प्राणवायू सिलेंडर , इंजेक्शन , औषधं पुरविले. त्यांच्या कार्यालयावर पोलिसांनी छापे टाकले. मदतीसाठी पैसा कोठून आला. विचारणा केली.दिलीप पांडे व आणखी काही जणांकडे छापे आहेत. आम्ही मदत करणार नाही.आमचं सरकार मदत करणार नाही. ना कोणाला मदत करू देणार . जनतेने तडफडत मरावं. असं हे सरकारंच वागणं बरं नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना पत्र लिहले. दगावणाऱ्यांची आकडेवारी लपविल्याची तक्रार केली. शेजारच्या गुजरात सरकारने मृत्यूचा 4218 चा आकडा दिला. प्रत्यक्षात मृत्यू प्रमाण पत्र 1 लाख  23 हजार वाटले. 2020 च्या तुलनेत हे आकडे दुप्पट आहेत. गतवर्षी वाटलेल्या प्रमाण पत्रांची संख्या 58 हजार होती. त्यावर कोणी पत्र लिहावे.राजकारणाची ही धुंदी दिसते.

 गंगा नदीच्या स्वच्छतेवर कोट्यवधी खर्च. त्या नदीत प्रेत तरंगताना दिसतात. जाळण्यास लाकडं मिळत नाहीत. पुरण्यास स्मशान घाटात जागा नाही. 1140 किलोमीटर अंतरात 2000 प्रेत आढळतात. भयावह स्थिती. किती मृत्यू . सरकार सागतं. मृतांचा आकडा दोन लाख. अर्थशास्त्रींच्या मते 10 लाख.कोणाचं मुलं गेलं. कोणाचे पालक गेले. अनेक निराधार झाली. तरी कोरानाचा कहर कायम आहे. नोकऱ्या गेल्या. उपचाराचा खर्च वाढला. त्यानं  सुमारे 23 कोटी मध्यमवर्गीयांना गरीबीच्या श्रेणीत ढकललं.  हे अजीज प्रेमजी विद्यापीठाचे रिसर्च सांगतं. अगोदर नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊनचा मार. त्या कहराने माणसं मेटकूटीस आली . कोरोनाच्या दुसऱ्या लहरीनं उरलीसुरली कसर काढली. आता तिसऱ्या लहरीचं संकट कायम आहे. कोरोनाच्या संकटावर लसीकरण एकमेव दिलासा. त्यात भारत सर्वाधिक माघारला. केवळ 2۔9 टक्के लोकांना लसीचे दोन डोज लागले. तोच लसींचा तुटवडा. बिहार , बंगालच्या निवडणुकीत मोदी-शहांनी मोफत लसीची घोषणा केली. आता माघार घेतली.जानेवारी 2021 पर्यंत लसीची मागणी नोंदविली नाही. दिवे अन् टाळ्यांनी कोरोना पळाला. या समजीच्या नंदनवनात सरकार होती. इस्राईल, चीन, अमेरिका  मास्क मुक्त झाला. हा दिवस भारतात केव्हा उजाडेल. तोपर्यंत मृत्यूचा आकडा किती असेल. ते बघायला कोण, कोण असेल. याचा दावा कोण करू शकेल. सोन्या सारख्या देशावर वाईट दिवस कसे आले. कोणामुळे आले. हे तर ठरवावे लागेल. देवांचा देश म्हणणाऱ्यांना उत्तर तर द्यावे लागेल.
-भूपेद्र गणवीर
....................BG................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.