Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २७, २०२१

शहरात पाणीपुरवठ्यासाठी आणखी पाच टँकर वाढविणार


शहरात पाणीपुरवठ्यासाठी आणखी पाच टँकर वाढविणार

- पाणी चोरीला आळा घालण्यासाठी टिल्लू पंप जप्त करा

- महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश

चंद्रपूर, ता. २७ : शहरातील ज्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, अशा विविध भागांमध्ये आणखी पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, याशिवाय पाण्याची चोरी करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी टिल्लू पंप जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचलवार यांनी दिले.

गुरुवारी (ता. २७ मे) महापौर कक्षात पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सत्तापक्ष नेता संदीप आवारी, उपायुक्त अशोक गराटे, उपअभियंता विजय बोरीकर, जलप्रदाय विभागाचे शाखा अभियंता संजय जोगी आदी उपस्थित होते.

महानगरातील पाणी टंचाईबाबत १६ एप्रिल रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेतली होती. कोरोनाच्या संकटसमयी पाणीटंचाईच्या प्रश्नासंदर्भात दुर्लक्ष होता कामा नये, अशा सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने या बैठकीत ब्रिज कम बंधारा बांधणे, विहिरी व बोअरींगच्या पाण्याची तपासणी करून ते पाणी पिण्यास योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत फलक लावणे, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बोअरींगनजिक रेन वॉटर हार्वेस्टींगची यंत्रणा बसविणे, आवश्यक तिथे मागणीनुसार टॅकर पोहचविणे, आदी विषयांवर आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला.

सध्यास्थितीत उन्हाळ्यामुळे शहरातील ज्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे, अशा भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी आणखी पाच टॅंकर वाढविण्यात याव्यात आणि गरजेनुसार टॅंकरची संख्या वाढविण्यात यावी, असे निर्देश महापौर राखी संजय कंचलवार यांनी दिलेत.

ज्यादा पाणी मिळवण्यासाठी अनेक जण नळांना टिल्लू पंप लावून पाणी चोरी करीत असतात. अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी टिल्लूपंप जप्तीची मोहीम विशेष पथकाद्वारे राबविण्याच्या सूचना देखील महापौरांनी दिल्या.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.