Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०३, २०२१

आरोग्य कामगारांच्या डेरा आंदोलनाचा आता कायदेशीर लढा

आरोग्य कामगारांच्या डेरा आंदोलनाचा आता कायदेशीर लढा



-आंदोलनाचे नेते पप्पू देशमुख आक्रमक 
- मानवाधिकार आयोगात तक्रार केली
- १ रुपया फीस घेत अ‍ॅड.दीपक चटपचा पुढाकार

चंद्रपूर :

गेल्या २२ दिवसांपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य क्षेत्रातील कामगारांचे डेरा आंदोलन सुरू आहे. ७ महिन्यांचे प्रलंबित वेतन मिळावे ही कोरोना योद्धा असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. नगरसेवक पप्पू देशमुख व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनात कंत्राटी कामगारांचे मुलाबाळांसह डेरा आंदोलन सुरू आहे.  आंदोलकांची योग्य दखल घेतली जात नसल्याने शासन व प्रशासन यांच्यावर नाराजी दर्शवत आंदोलनकर्त्यांनी आता कायद्याचा मार्ग अवलंबला आहे. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.दीपक चटप यांनी एक रुपया नाममात्र फिस घेत राज्य मानवाधिकार आयोगाकडे सदर प्रकरणाची तक्रार दाखल करुन पुढाकार घेतला आहे. डेरा आंदोलनाचे नेते पप्पू देशुमुख यांच्यासह  कंत्राटी कामगारांनी या तक्रार याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. 

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील ४५० पेक्षा अधिक कंत्राटी कामगारांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. 'कागज- कानुन लेकर हल्लाबोल' असे ब्रिदवाक्य ठरवत या आंदोलनाचा रेटा वाढविण्यात आला. भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ नुसार प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केला असून वेतन प्रलंबित असल्याने मूलभूत मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे. 

एका बाजूने कोरोना वॉरियर्स म्हणून आरोग्य कामगारांचा सत्कार केला जातो तर दुसरीकडे त्यांना वेतन न देणे ही बाब ही निंदनीय आहे. कंत्राटी कामगार कायदा १९७० मधील कलम २१ प्रमाणे सरकारने या आरोग्य कामगारांचा पगार तातडीने जमा करणे जरुरीचे असल्याचे मत अ‍ॅड.दीपक चटप यांनी मांडले. राज्य मानवाधिकार आयोगासमोर चंद्रपूर येथील आरोग्य क्षेत्रातील कंत्राटी कामगारांची बाजू अ‍ॅड.दीपक चटप मांडणार असून तशी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आरोग्य कामगारांच्या सात महिन्याच्या वेतनाबाबत शासन व प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने कायद्याचा मार्ग अवलंबावा लागला. आगामी काळात राज्य महीला आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग यांच्याकडेही तक्रार दाखल करुन आता कायदेशीर लढा देणार असल्याचे आंदोलनाचे नेते, नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सांगितले.

डेरा आंदोलनाला आप व शिक्षक सेनेचा पाठिंबा

आम आदमी पार्टी चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे व महानगर अध्यक्ष अॅड.राजेश विराणी यांचे नेतृत्वात संतोष दोरखंडे  , भिवराज सोनी, योगेश आपटे ,राजेश चेडगुलवार , अशोक आनंदे , प्रतिक विराणी , मयूर  राईकवार, मारोती धकाते, प्रदीप बोबडे, वंदना गवळी तसेच शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा प्रमुख राजेश नायडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक सेनेचे पदाधिकारी अनिल ददगाळ, आनंद प्रसाद ,गौरव  नागदेवते, विनोद निखाडे ,राहुल द्विवेदी, सुलभा साळवे, प्रतिमा नायडू यांचे शिष्टमंडळाने डेरा आंदोलनाला भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले.

Attachments are

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.