सुप्रसिद्ध, ऐतिहासिक प्रतापगड यात्रेवर कोरोणाचे सावट
प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व यात्रा केल्या रद्द.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. 3 मार्च:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध ,ऐतिहासिक प्रतापगड येथे दिनांक 9 मार्च ते 15 मार्च सलग पाच दिवसापर्यंत महाशिवरात्री व खाव्जा उस्मान गणी हारूनी उर्स करिता यात्रा भरत असते. यात्रेमध्ये दरवर्षी दररोज दोन ते तीन लक्ष भाविक देव दर्शनाकरता जिल्ह्यातून, राज्यातून व परराज्यातून भाविक महादेवाचा पोहा(नवस फेडण्यासाठी) घेऊन मुक्कामी येत असतात. त्यामुळे गर्दीचे स्वरूप या यात्रेला प्राप्त होत असते. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली, तरी प्रतापगड तसेच गोंदिया जिल्ह्यातील इतर ठिकाणी 11 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने यात्रा भरल्यास सामाजिक अंतराचे पालन होण्यास अडचण निर्माण होऊन, कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे भाविक, सामान्य जनता यांच्या आरोग्यास हानी होऊ शकते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरू शकते. त्यामुळे यात्रा भरविणे उचित होणार नसल्याचे तहसीलदार अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत प्रतापगड तसेच गोंदिया जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणी जिथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असतात. त्या सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश दिनांक 2 मार्च रोजी काढले आहे. त्यामुळे भाविकांची निराशा झाली आहे. आरोग्याचे हित हे सर्वतोपरी आहे. त्यामुळे प्रतापगड यात्रेत गर्दी न करता प्रशासनाचे आदेश भाविकांनी पाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विनोद मेश्राम यांनी केले आहे.