चंद्रपूर, जळगावच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय
उभारणी संदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 24 : चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात कराराप्रमाणे दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच काम पूर्ण करावे. याचबरोबर जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे काम नियमानुसार उपलब्ध निधीत पूर्ण करावयाच्या कार्यवाहीस गती द्यावी. संबंधीत कामाचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
मंत्रालयात चंद्रपूर आणि जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, जे.जे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे महाव्यवस्थापक नरेंद्र कुमार, उपमहाव्यवस्थापक बिनोद कुमार, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरूण हुमने, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.पोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर.के. जावन्जळ, यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम केंद्र शासनाने दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच पूर्ण करावे. समांतर वैद्यकीय तंत्रज्ञान खरेदी आणि त्यासंदर्भातील तांत्रिक मान्यतेबाबतही कार्यवाहीस गती द्यावी. याचबरोबर जळगाव येथील रुग्णालयासाठीच्या जमिनीची पाहणी करून, केंद्र शासनाच्या प्रकल्प सल्लागार कंपनीप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. संबंधीत कामाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.