टुरींग टॉकीजला वस्तु व सेवा करातून सूट मिळण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 24 : सिनेमा गावागावात पोहोचविण्यात महत्वाचा वाटा टुरींग टॉकीजचा आहे. लॉकडाऊननंतर टुरींग टॉकीज मालकांचे मोठे नुकसान झाले असल्याने टुरींग टॉकीजला वस्तु व सेवा करातून सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील टुरींग टॉकीजच्या प्रश्नांसदर्भातील बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरीचे संचालक संजय पाटील यांच्यासह टुरींग टॉकीज चालविणारे मालक उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आज राज्यभरात जवळपास 50 हून अधिक टुरींग टॉकीज सुरु असून यामध्ये 90 टक्के मराठी आणि 10 टक्के हिंदी सिनेमे दाखविण्यात येतात. टुरींग टॉकीजमुळे सिनेमा गावागावात पोहोचण्याबरोबरच अत्यल्प दरात प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. या क्षेत्राला बळकटी देण्याबरोबरच टुरींग टॉकीज मालकांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नव्याने कोणती योजना लागू करता येईल याचा अभ्यास केला जावा, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथून सिनेमा, मालिका, जाहिरात आणि ओटीटी माध्यमांना चित्रीकरण करण्याची परवानगी एक खिडकी परवाना योजनेच्या माध्यमातून दिली जाते. आता टुरींग टॉकीजला यामध्ये कसे सामावून घेता येईल याबाबतही विचार करण्यात येईल. वर्षभरातून येणारे यात्रा, महोत्सव लक्षात घेता टुरींग टॉकीज मालकांना पोर्टेबल मीटर देणे, शासनामार्फत देण्यात येणारी पेन्शन योजना टुरींग टॉकीज मालकांना देता येईल का याबाबत अभ्यास करणे आणि भांडवली अनुदान उपलब्ध कसे करुन देता येईल याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
००००